दुष्काळी मदत तोकडी : हेक्टरी खर्च ४० हजार; मदत केवळ ६८०० रुपये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 10:44 AM2019-02-09T10:44:07+5:302019-02-09T10:44:12+5:30
शेती पिकांच्या उत्पादनासाठी हेक्टरी सरासरी ३५ ते ४० हजार रुपयांचा खर्च करावा लागत असताना, त्या तुलनेत पीक नुकसान भरपाईपोटी मिळणारी हेक्टरी ६ हजार ८०० रुपयांची मदत अत्यंत तोकडी ठरत असल्याने, दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकºयांना या मदतीने दिलासा मिळणार काय, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
- संतोष येलकर
अकोला: जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकºयांना दोन हेक्टर मर्यादेपर्यंत हेक्टरी ६ हजार ८०० रुपयांची मदत शासनामार्फत मंजूर करण्यात आली असून, मदत वाटपाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे; परंतु शेती पिकांच्या उत्पादनासाठी हेक्टरी सरासरी ३५ ते ४० हजार रुपयांचा खर्च करावा लागत असताना, त्या तुलनेत पीक नुकसान भरपाईपोटी मिळणारी हेक्टरी ६ हजार ८०० रुपयांची मदत अत्यंत तोकडी ठरत असल्याने, दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकºयांना या मदतीने दिलासा मिळणार काय, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांमधील पीक नुकसान भरपाईपोटी दुष्काळग्रस्त शेतकºयांना दोन हप्त्यांत मदत वाटप करण्यास शासनामार्फत २५ जानेवारी रोजी मान्यता देण्यात आली. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी ८१ कोटी ५५ लाख ५ हजार ४५६ रुपयांचा मदतनिधी मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी पहिल्या हप्त्यापोटी ४० कोटी ७७ लाख ७ हजार ७२८ रुपयांचा मदतनिधी प्राप्त झाला आहे. दोन हेक्टर मर्यादेपर्यंत मदतीचे वाटप करण्यात येणार असून, शेती पिकांच्या नुकसान भरपाईपोटी प्रतिहेक्टर ६ हजार ८०० रुपये आणि बहुवार्षिक पीक नुकसान भरपाईपोटी प्रतिहेक्टर १८ हजार रुपयांची मदत दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. कपाशी, सोयाबीन, तूर, मूग व उडीद इत्यादी पिकांच्या उत्पादनासाठी पेरणीपासून काढणीपर्यंत हेक्टरी सरासरी ३५ ते ४० हजार रुपये शेतकºयांना खर्च करावा लागतो. पिकांसाठी केलेला उत्पादन खर्च बघता, पीक नुकसान भरपाईपोटी शासनाकडून जाहीर करण्यात आलेली दुष्काळी मदत संकटात सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देणारी ठरणार काय, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पीकनिहाय हेक्टरी असा करावा लागतो खर्च!
शेती पिकांच्या उत्पादनासाठी जमिनीची मशागत, पेरणी, खते, कीटकनाशकांची फवारणी, अंतर्गत मशागत वेचणी-काढणी व मजुरीपोटी हेक्टरी सरासरी ३५ ते ४० हजार रुपयांचा खर्च शेतकºयांना करावा लागतो. त्यामध्ये कपाशी पिकासाठी हेक्टरी ४० ते ५० हजार रुपये, सोयाबीन पिकासाठी हेक्टरी ३५ ते ४० हजार रुपये आणि मूग व उडीद पिकासाठी हेक्टरी ३० ते ३५ हजार रुपये खर्च करावा लागतो.
दुष्काळी परिस्थितीत शेती पिकांच्या नुकसान भरपाईपोटी दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी शासनाकडून जाहीर करण्यात आलेली हेक्टरी ६ हजार ८०० रुपयांची मदत ही तुटपुंजी आहे. संकटात सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी हेक्टरी किमान २० हजार रुपयांची मदत मिळाली पाहिजे. त्यासाठी शासनाने मदतीच्या रकमेत वाढ केली पाहिजे.
- प्रशांत गावंडे
शेतकरी जागर मंच, अकोला.
पीक नुकसान भरपाईपोटी हेक्टरी ६ हजार ८०० रुपये आणि बहुवार्षिक पीक नुकसान भरपाईपोटी १८ हजार रुपयांची मदत शासनाने जाहीर केली आहे. दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी ही मदत दिलासा देणारी आहे.
- गणेश कंडारकर
जिल्हाध्यक्ष, भाजपा शेतकरी आघाडी.
कपाशी, सोयाबीन, मूग व उडीद या पिकांच्या उत्पादनासाठी शेतकºयांना हेक्टरी ३५ ते ४० हजार रुपये खर्च करावा लागतो. त्या तुलनेत पीक नुकसान भरपाईपोटी शासनाने जाहीर केलेली हेक्टरी ६ हजार ८०० रुपयांची मदत दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळणारी असून, या मदतीने संकटात सापडलेल्या शेतकºयांना दिलासा मिळणार नाही.
-मनोज तायडे
शेतकरी नेता, अकोला.