दुष्काळी तालुक्यात घटली पिकांची उत्पादकता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:15 PM2018-10-29T12:15:37+5:302018-10-29T12:16:33+5:30
अकोला : जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या पाच तालुक्यांत नजरअंदाज पाहणी अहवालानुसार सरासरी ३.७१ क्विंटल प्रतिहेक्टर खरीप पिकांची उत्पादकता घटली आहे.
अकोला : जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या पाच तालुक्यांत नजरअंदाज पाहणी अहवालानुसार सरासरी ३.७१ क्विंटल प्रतिहेक्टर खरीप पिकांची उत्पादकता घटली आहे. यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २५ आक्टोबर रोजी राज्याचे कृषी आयुक्त आणि अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे.
पावसातील खंड, भूजल पातळी, जमिनीतील आर्द्रतेचे कमी प्रमाण लक्षात घेता खरीप पिकांचे उत्पादन कमी झाल्याने, जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यानुषंगाने सरकारकडून २३ आॅक्टोबर रोजी राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली असून, त्यामध्ये जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा समावेश आहे. दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या जिल्ह्यातील पाचही तालुक्यांतील खरीप पिकांचे सरासरी पेरणी क्षेत्र त्या तुलनेत करण्यात आलेल्या पेरणीचे क्षेत्र, पिकांचे उत्पादन आणि पिकांची उत्पादकता यासंदर्भात नजरअंदाज पाहणीचे अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी पाचही तालुक्यांचे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार प्राप्त झालेल्या अहवालांच्या आधारे जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, ज्वारी, मूग, उडीद व तूर इत्यादी खरीप पिकांच्या उत्पादकतेत सरासरी ३.७१ क्विंटल प्रतिहेक्टर घट झाली आहे. यासोबतच खरीप पिकांचे क्षेत्र आणि उत्पादनातही घट झाली आहे. यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्याचे कृषी आयुक्त आणि अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
पिकांचे पेरणी क्षेत्र आणि उत्पादन असे झाले कमी!
जिल्ह्यातील दुष्काळसदृश पाच तालुक्यांतील खरीप पिकांच्या नजरअंदाज पाहणी अहवालानुसार दुष्काळसदृश पाच तालुक्यांतील खरीप पिकांचे सरासरी पेरणी क्षेत्र आणि पिकांचे उत्पादन लक्षात घेता, पाचही तालुक्यांत २ हजार ७११ हेक्टर खरीप पीक पेरणीचे क्षेत्र कमी झाले असून, ७१ हजार ५९८ क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन कमी झाले आहे.
दुष्काळसदृश पाच तालुक्यांत अशी आहेत गावे!
तालुका गावे
अकोला १८२
तेल्हारा १०६
बाळापूर १०३
मूर्तिजापूर १६४
बार्शीटाकळी १५७
..................................
एकूण ७१२