निवडणुकीच्या धामधुमीत अडकले दुष्काळी मदतीचे वाटप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 12:17 PM2019-10-14T12:17:09+5:302019-10-14T12:17:17+5:30
दुष्काळी मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
- संतोष येलकर
अकोला : गतवर्षी दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांना चौथ्या टप्प्यातील दुष्काळी मदत वाटप करण्यासाठी ६१ कोटी ४९ लाख ७५ हजार रुपयांचा मदत निधी महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील पाच तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आला असला तरी, विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत दुष्काळी मदतीचे वाटप अडकले आहेत. त्यामुळे दुष्काळी मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गतवर्षी शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या पहिल्या यादीत अकोला जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १९९ कोटी रुपये मदत निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार शासनामार्फत तीन टप्प्यांत १३७ कोटी ६१ लाख २ हजार ४५६ रुपयांचा मदत निधी प्राप्त झाला होता. उपलब्ध दुष्काळी मदत दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. उर्वरित चौथ्या टप्प्यातील ६१ कोटी ४९ लाख ७५ हजार रुपयांची दुष्काळी मदत १० सप्टेंबर रोजी शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली. उपलब्ध मदत १३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर या पाचही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली. मदत निधी वितरित करण्यात आला असला तरी, विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने, दुष्काळी मदतीची रक्कम पाचही तालुक्यांतील शेतकºयांच्या बँक खात्यात अद्याप जमा झाली नाही. त्यामुळे दुष्काळी मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तालुकानिहाय अशी वितरित करण्यात आली मदत!
जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शेतकºयांसाठी ६१ कोटी ४९ लाख ७५ हजार रुपयांची दुष्काळी मदत संबंधित तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली. त्यामध्ये अकोला तालुका-१६ कोटी २५ लाख ७ हजार ५१७ रुपये, बार्शीटाकळी तालुका-१० कोटी १३ लाख ३१ हजार २७४ रुपये, तेल्हारा तालुका-९ कोटी ५९ लाख १२ हजार ७९७ रुपये, बाळापूर तालुका-१२ कोटी ५१ लाख ९१ हजार २४५ रुपये व मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकºयांसाठी १२ कोटी ९९ लाख ६४ हजार ५१४ रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे.
दुष्काळी मदतीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यासाठी शेतकºयांच्या याद्या आणि मदत निधीचे धनादेश संबंधित बँकांमध्ये जमा करण्यात आले आहेत. मदतीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
-विजय लोखंडे,
तहसीलदार, अकोला.