राजकीय उदासीनतेत अडकला दोन जिल्ह्यांचा ‘दुष्काळ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2016 02:18 AM2016-01-08T02:18:46+5:302016-01-08T02:18:46+5:30
अकोला, वाशिम जिल्ह्यांतील १७३५ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची प्रतीक्षा.
संतोष येलकर/अकोला: राज्यातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सर्व १ हजार ४२0 गावांचा समावेश करण्यात आला; मात्र सुधारित व अंतिम पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असलेल्या अकोला व वाशिम या जिल्ह्यांतील १ हजार ७३५ गावांमध्ये अद्यापही दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली नाही. दोन्ही जिल्ह्यांमध्ये सत्ताधारी सेना-भाजपचे प्राबल्य असतानाही, केवळ राजकीय उदासीनतेमुळे या गावांचा दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत समावेश होऊ शकला नसल्याचे चित्र दिसत आहे.
यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. खरीप पिकांची ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या राज्यातील १४ हजार ७0८ गावांमध्ये २0 ऑक्टोबर रोजीच्या शासननिर्णयानुसार दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली. त्यामध्ये नजरअंदाज पैसेवारीनुसार ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या अकोला जिल्ह्यातील ५५ गावांचा, तर वाशिम व बुलडाणा या दोन जिल्ह्यांतील एकाही गावाचा समावेश करण्यात आला नव्हता. नोव्हेंबरमध्ये जाहीर करण्यात आलेल्या खरीप पिकांच्या सुधारित पैसेवारीनुसार अकोला, बुलडाणा व वाशिम या तीनही जिल्ह्यांतील लागवडयोग्य सर्व गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी जाहीर करण्यात आली, तसेच अंतिम पैसेवारीदेखील ५0 पैशांपेक्षा कमी आहे. लागवडयोग्य सर्व गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्याने, तीनही जिल्ह्यांतील सर्व गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात शासनाच्या ९ नोव्हेंबर रोजीच्या परिपत्रकानुसार बुलडाणा जिल्ह्यातील सर्व १ हजार ४२0 गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली; मात्र सुधारित व अंतिम पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असूनही दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत अकोला जिल्ह्यातील एकूण ९९७ पैकी केवळ ५५ गावे कायम ठेवण्यात आली, तर वाशिम जिल्ह्यातील एकूण ७९३ पैकी एकाही गावाचा दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. खरीप पिकांची ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील सर्व १ हजार ४२0 गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली; मात्र पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असलेल्या अकोला जिल्ह्यातील ९४२ आणि वाशिम जिल्ह्यातील ७९३ गावे अद्यापही दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली नाहीत.
सत्ताधारी आठ आमदार, मंत्री असूनही ह्यदुष्काळह्ण कायमच!
अकोला जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे सहा, तर वाशिम जिल्ह्यात दोन आमदार आहेत. याशिवाय एक मंत्रीही अकोला जिल्ह्याला लाभला आहे. तरीही या दोन जिल्ह्यांतील सर्व गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्यात या लोकप्रतिनिधींना यश आले नाही. सक्षम प्रतिनिधीत्वाचा दुष्काळच या दोन्ही जिल्ह्यांच्या नशिबी असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.
तीन जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त गावे!
जिल्हा एकूण गावे दुष्काळग्रस्त गावे
अकोला ९९७ ५५
बुलडाणा १४२0 १४२0
वाशिम ७९३ 00