पशू उपचार केंद्रातील औषधीचा गैरवापर, नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:11 AM2020-12-28T04:11:27+5:302020-12-28T04:11:27+5:30
नासीर शेख खेट्री : पातूर पंचायत समिती अंतर्गत उमरा येथील पशु उपचार केंद्रातील औषधीचा गैरवापर करून नासाडी केल्याचा ...
नासीर शेख
खेट्री : पातूर पंचायत समिती अंतर्गत उमरा येथील पशु उपचार केंद्रातील औषधीचा गैरवापर करून नासाडी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उपचार केंद्राला नेहमी कुलूप असते, पशुधन पर्यवेक्षक नेहमी गायब असल्याने गावातील पशुपालकांची जनावरे उपचाराअभावी वंचित राहतात. उपचार केंद्राचा कारभार गावातील खासगी डॉक्टर चालवतात. ते केंद्रातील औषध घरी घेऊन जातात व उपचाराच्या नावावर आर्थिक लूट करीत असल्याचा आरोप पशुपालकांनी केला आहे.
संबंधित वरिष्ठांच्या हलगर्जीमुळे उपचार केंद्राला नेहमी कुलूप असते, खासगी डॉक्टरकडे पशू उपचार केंद्राच्या कुलपाची चावी असते, खासगी डॉक्टर औषध घेण्यापुरते उपचार केंद्र उघडतात, औषध घरी घेऊन जातात. पशुपालकांच्या जनावरांवर उपचार करण्यासाठी पैशाची लूट करीत असल्याचा आरोप होत आहे. याबाबत गावातील पशुपालकांनी संबंधित वरिष्ठांकडे वारंवार तक्रार केली, परंतु संबंधितांकडून अद्यापही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे पशुपालकांना पैसे देऊन जनावरांवर उपचार करून घ्यावे लागत आहेत. या गंभीर बाबीची संबंधित वरिष्ठांनी दखल घेऊन पशुपालकांची होणारी लूट थांबवावी, अशी मागणी होत आहे.
----------बाॅक्स-----
उघड्यावर फेकले जाते औषध
मुदतबाह्य होईपर्यंत औषधीचा वापर केला जात नाही. जनावरांवर मोफत उपचार केले जात नाहीत. मुदतबाह्य औषधीचा साठा केंद्राच्या बाजूला एका खड्ड्यात उघड्यावर फेकला जाताे. त्यामुळे औषधीची नासाडी होत असून, ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
----------बाॅक्स-------
पशुपालकांसह जनावरे ताटकळत
उपचार करण्यासाठी पशुपालक जनावरे पशू उपचार केंद्रात आणतात, परंतु पशुधन पर्यवेक्षकाची नेहमी दांडी आल्याने सकाळपासून सायंकाळपर्यंत ताटकळत बसून,पशुपालक आपली जनावरे उपचाराविनाच परत घरी नेतात.
-------------काेट-----
पशू उपचार केंद्राला नेहमी कुलूप असते. त्यातील औषधीचा वापर खासगी डॉक्टर करून पशुपालकांकडून पैशांची लूट करतात. त्यामुळे पशुपालकांची आर्थिक लूट होत आहे. याबाबत संबंधित वरिष्ठांकडे वारंवार तक्रार केली, परंतु अद्याप दखल घेतली गेली नाही.
विठ्ठल मुके, पशुपालक, उमरा
---------------
माझ्याकडे दोन महिन्यांपासून अतिरिक्त प्रभार आहे. तसेच ऑनलाइनची कामे सुरू आहेत. खासगी डॉक्टरचा व आमचा काहीही संबंध नाही. याबाबत चौकशी करून सांगण्यात येईल.
डी. आर. सुडके, पशुधन पर्यवेक्षक, पशु उपचार केंद्र, उमरा