अमली पदार्थांची विक्री करणारा पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:17 AM2021-03-06T04:17:49+5:302021-03-06T04:17:49+5:30
दहशतवाद विरोधी कक्षाची कारवाई अकोला : खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या मलकापूर रेल्वे गेटजवळ गांजाची विक्री करणाऱ्यास ...
दहशतवाद विरोधी कक्षाची कारवाई
अकोला : खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या मलकापूर रेल्वे गेटजवळ गांजाची विक्री करणाऱ्यास पोलीस अधीक्षक यांच्या दहशतवाद विरोधी पथकाने गुरुवारी रात्री अटक केली.
मलकापूर ग्रामपंचायत ते रेल्वे क्रॉसिंगजवळ आकृती नगरमधील रहिवासी सचिन आनंदा इंगळे वय ४० वर्षे हा ज्युपिटर गाडीच्या डिकीत गांजा ठेवून त्याची अवैधरित्या विक्री करीत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी कक्षाला मिळाली. या माहितीवरून दहशतवाद विरोधी पक्षाचे प्रमुख विलास पाटील यांनी रेल्वे क्रॉसिंग जवळ गुरुवारी रात्री पाळत ठेवून सचिन आनंद इंगळे यास ताब्यात घेतले त्यानंतर त्याच्या दुचाकीची झडती घेतली असता दुचाकीच्या डिकीमध्ये १५५ ग्रॅम गांजा आढळला. पोलिसांनी सचिन इंगळे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील एक दुचाकी, गांजा मोजण्यासाठी वापरण्यात येत असलेला इलेक्ट्रॉनिक वजन काटा,एक मोबाईल असा एकूण ७६००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्या विरोधात खदान पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट कलम २० ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या दहशतवादी पथकाचे प्रमुख विलास पाटील आणि त्यांच्या पथकाने केली.