‘ड्रंक अँन्ड ड्राइव्ह’ प्रकरणात युवकास कारावासाची शिक्षा
By admin | Published: August 13, 2016 01:44 AM2016-08-13T01:44:16+5:302016-08-13T01:44:16+5:30
न्यायालयाचा तत्काळ निकाल: दंड भरल्याने शिक्षा टळली.
अकोला, दि. १२ : मद्यप्राशन करून रस्त्यावर भरधाव मोटारसायकल चालविणार्या युवकास प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी वाय.जी. मेश्राम यांच्या न्यायालयाने २३00 रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना सहा दिवस साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली; परंतु युवकाने दंड भरल्यामुळे त्याच्यावरील कारावासाची शिक्षा टळली.
पोलीस वाहतून नियंत्रण शाखेत कार्यरत असलेले पोलीस जमादार प्रकाश तायडे यांच्या तक्रारीनुसार गांधी रोड परिसरात ४ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद कॉलनीत राहणारा विपीन देशमुख (३0) हा युवक मद्यधुंद अवस्थेत मोटारसायकल चालवित असल्याचे दिसून आले. तायडे यांनी त्याला थांबवून, त्याची तपासणी केली असता, त्याने मद्यप्राशन केल्याचे दिसून आले. त्यांनी त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात कलम १८५, १३0, (१, २) ४४, १७७ मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्यानुसार युवक ६ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर झाला. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी वाय.जी. मेश्राम यांनी त्याच दिवशी प्रकरणावर सुनावणी घेतली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आरोपी युवक दोषी आढळून आल्यामुळे न्यायदंडाधिकारी मेश्राम यांनी त्याला जागेवरच २३00 रुपये दंड सुनावला. दंड न भरल्यास एक महिना सहा दिवस कारावासाची शिक्षाही सुनावली; परंतु युवकाने दंड भरल्यामुळे त्याच्यावरील कारावासाची शिक्षा ठळली.