अस्वलाच्या हल्ल्यात शेतमजूर ठार
By admin | Published: May 23, 2016 01:39 AM2016-05-23T01:39:37+5:302016-05-23T02:13:40+5:30
वन्य प्राण्यांचे हल्ले वाढले : बारा दिवसांत दुसरा बळी; शेतक-यांमध्ये भीती!
उंद्री (जि. बुलडाणा): भीषण उन्हाळय़ात जंगलातील पाणवठे आटल्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. त्यामुळे परिसरातील रहिवाशांवर वन्य प्राण्यांचे हल्ले वाढत आहेत. अशा घटनेत मागील १२ दिवसांत दोघांना आपला जीव गमवावा लागला असून, अस्वलाच्या हल्ल्यात शेतमजूर ठार झाल्याची घटना चिखली तालुक्यातील करवंड शिवारात २२ मे रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चिखली तालुक्यातील करवंड येथील रहिवासी लालसिंह सेवा पवार (५२) हे गावातील राजू राजपूत यांच्या शेतात काम करीत होते. सध्या परिसरातील शेतकरी खरीप हंगामाची तयारी करीत आहेत. मजूर लालसिंह पवार रविवारी सकाळी ७ वाजता शेतात काम करीत होते. यादरम्यान अचानक अस्वलाने लालसिंह यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अस्वलाने लालसिंह यांना ठिकठिकाणी नखे मारून गंभीर जखमी केले. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. चवताळलेल्या अस्वलाने त्यांच्या शरीराची चाळण केली. घटनास्थळापासून काही फूट अंतरावर हात व शरीराचे अवयव आढळले. याबाबतची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी भेट देणार्या शेतकर्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.