पावसाळय़ात टाळा विजेचे धोके!

By admin | Published: June 26, 2017 01:29 PM2017-06-26T13:29:40+5:302017-06-26T13:29:40+5:30

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर विजेचे धोके व दुर्घटना टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

Due to the dangers of rain in the rain! | पावसाळय़ात टाळा विजेचे धोके!

पावसाळय़ात टाळा विजेचे धोके!

Next

विद्युत उपकरणे काळजीपूर्वक हाताळा: महावितरणचे आवाहन

अकोला : आज जीवनामध्ये विजेचे महत्त्व व फायदे वाढलेले आहेत; मात्र सावधानता बाळगली नाही, तर नुकसानही होऊ शकते. पावसाळ्यात विद्युत उपकरणे आणि तारांमुळे विद्युत अपघात घडल्याच्या दुर्दैवी घटना घडतात. त्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर विजेचे धोके व दुर्घटना टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत. विद्युत ग्राहकांनी या सूचनांचे पालन करून सावध व सुरक्षित राहण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आलेले आहे. विजांचा कडकडाट होत असले, तर सर्व विद्युत उपकरणे बंद करून ते मूळ वीज कनेक्शनपासून बाजूला करावी. आपल्या घरातील अर्थिंग सुस्थितीत असावी आणि गरजेनुसार त्याची तपासणी करावी. जमिनीवर तुटून पडलेल्या वीज तारांना स्पर्श करू नये आणि लोंबकळणार्‍या वीज तारांपासून सावध राहावे व तातडीने वीज कंपनीला त्याची माहिती द्यावी. पावसापासून बचाव करताना आजूबाजूला जिवंत विद्युत तारा धोकादायक स्थितीत नसल्याची खात्री करून घ्यावी. त्यास हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये. कपडे वाळविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तारांचा वापर टाळावा. कारण अनवधानाने ही तार वीज प्रवाह असलेल्या तारांच्या संपर्कात आली तर मोठी दुर्घटना होऊ शकते. घरातील दूरचित्रवाणीची डिश किंवा अँन्टेना वीज तारांपासून दूर ठेवावे. विद्युत उपकरणे दुरुस्ती करताना मेन स्विच बंद करावा. विद्युत उपकरणांना पाणी लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. मीटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मीटरचे मुख्य स्विच बंद करावे. जागा बदलून घ्यावी. कोळी, कीटक, पाल, झुरळ, चिमण्या उबदार जागा म्हणून मीटर तसेच स्विच बोर्डच्या आश्रयाला येतात, त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊ शकते. पावसाळ्यात विद्युत उपकरणे असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस व अशा विद्युत उपकरणांना हात लावू नये, तसेच ओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. अशी उपकरणे खिडकी तसेच बाल्कनीपासून दूर असावीत. वीज उपकरणे हाताळताना पायात स्लीपर चप्पल घालावी व वीज पुरवठा बंद झाल्याची खात्री करावी. विद्युत खांबाला व ताणाला जनावरे बांधू नये. वीज पुरवठा खंडित झाल्यास १५ ते २0 मिनिटे थांबूनच महावितरणला संपर्क करावा. तार तुटल्यास वा पोल पडल्यास तसेच बिघाड नेमका कोठे झाला, याची माहिती असल्यास वीज कंपनीला संपर्क करावा. मेन स्विचमध्ये फ्युज तार म्हणून तांब्याची तार वापरू नये. त्याऐवजी अँल्युमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरली पाहिजे. येथे नोंदवा तक्रार ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण वेळेत व्हावे, यासाठी महावितरणने ग्राहक सुविधा केंद्र सुरू केले आहे. ग्राहकाने १८00२३३३४३५, १८00२00३४३५, १९१२ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी.

Web Title: Due to the dangers of rain in the rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.