अटलजींच्या त्याग, समर्पणामुळेच भाजपाला अच्छे दिन - खासदार संजय धोत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:06 PM2018-08-20T13:06:35+5:302018-08-20T13:07:16+5:30
अकोला : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या संघटन कौशल्यामुळे जनसंघ, भाजपाचा विस्तार झाला. एकेकाळी पक्षाला जनाधार नव्हता. केवळ अटलजींच्या नावाशिवाय पक्षाकडे काही नव्हते. विरोधी पक्षाचे नेते, लोक आमची टिंगल उडवायचे. तुम्ही कधी सत्तेत येऊ शकत नाही, असे म्हणायचे. सातत्याने पक्षाचा पराभव होत होता; परंतु अटलबिहारी वाजपेयी खचले नाहीत. कार्यकर्ते जोडत गेले. परिश्रमाने त्यांनी पक्षाला देशपातळीवर पोहोचविले आणि सत्तेतसुद्धा बसविले. अटलजींचा त्याग, समर्पणामुळेच भाजपाला ‘अच्छे दिन’ प्राप्त झाले. अशा शब्दात खासदार संजय धोत्रे यांनी अटलजींना सुमनांजली अर्पित केली.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, ज्येष्ठ सहकार नेते वसंतराव धोत्रे यांचे नुकतेच निधन झाले. त्यानिमित्त भाजपाच्यावतीने मराठा मंदिरात दुपारी ३ वाजता श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानावरून खासदार धोत्रे बोलत होते. त्यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार रणधीर सावरकर, माजी आ. नारायणराव गव्हाणकर, महापौर विजय अग्रवाल, रा.स्व. संघाचे नगर संघचालक गोपाल खंडेलवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार धोत्रे म्हणाले, मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर आणीबाणी लागली. घरात राजकारण असून, राजकारणाविषयी मी गंभीर नव्हतो. राजकारणात आलो, त्यावेळी भाजपाचे फार अस्तित्व नव्हते. सत्ता नव्हती. असे सांगत अटलबिहारी वाजपेयी यांनी मेहनतीने देशभर फिरून पक्षाचा विस्तार केला. सर्वमान्य नेता म्हणून जनतेच्या हृदयात जागा मिळविली. त्यांचे योगदान देश कधीही विसरणार नाही. त्यांच्या स्मृती, विचार सदैव अमर राहतील, अशा भावना खासदार धोत्रे यांनी व्यक्त केल्या. श्रद्धांजली सभेत आमदार प्रकाश भारसाकळे यांनी अटलजींनी सर्वांना सोबत घेऊन काम केले. सत्तेची त्यांनी कधी अपेक्षा केली नाही. कार्यकर्ते, लोक जोडण्याचे काम ते सदैव करीत राहिले. त्यांचे विचार सदैव पक्ष कार्यकर्त्यांना प्रेरणा देत राहतील, अशा शब्दात श्रद्धांजली अर्पित केली. यासोबतच माजी महापौर सुमनताई गावंडे, अटलजींसोबत निकटचा संबंध असलेले सिद्धार्थ शर्मा, उपमहापौर वैशाली शेळके, बंडोपंत पंचभाई, महापौर विजय अग्रवाल, राष्ट्र सेविका समितीच्या श्रद्धा पाटखेडकर, रा. स्व. संघाचे नगर संघचालक गोपाल खंडेलवाल यांनीही अटलजींच्या आठवणी सांगितल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांनी केले. संचालन महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी केले. सभेला भाजपचे नगरसेवक, जि.प. सदस्य व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
अटलजींच्या मेहनतीमुळेच आम्ही सत्तेत - शर्मा
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणी सांगताना, आमदार गोवर्धन शर्मा यांनी १९६३ मध्ये भारतीय जनसंघाचे अकोल्यात प्रांत अधिवेशन झाले. त्यावेळी मी १३ वर्षांचा होतो. त्यावेळी अटलजींना जवळून पाहण्याचा योग आला. पक्षाचे अस्तित्व नव्हते. जनसंघाची लोक टिंगल उडवायचे. प्रचाराला वाहनसुद्धा मिळायचे नाही. अशा परिस्थितीत अटलजींना पक्षविस्तारासाठी मेहनत घेतली, असे सांगत सर्वच समाजाचे कार्यकर्ते पक्षाशी जोडले. संघटन वाढविले. त्यांच्यामुळेच आमच्यासारखे कार्यकर्ते आमदार, खासदार बनू शकले. त्यांच्या त्यागामुळेच पक्ष केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये सत्तेत आहे, अशा भावना आमदार गोवर्धन शर्मा यांनी व्यक्त केल्या.