दुष्काळाची चाहूल; शेतकरी धास्तावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:53 PM2019-07-12T12:53:43+5:302019-07-12T12:55:05+5:30
सलग तीन वर्षांपासून दुष्काळ अन् नापिकीने आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकरी पुन्हा दुष्काळाच्या स्थितीने धास्तावला आहे.
अकोला: यंदाच्या पावसाळ्याचे १२० पैकी ४० दिवस झाले असतानाही पावसाची सरासरी कमी आहे. विशेष म्हणजे, २४ जूनला मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सक्रिय न झाल्याने जुलै उजाडला तरी जिल्ह्यातील अर्ध्याअधिक पेरण्या रखडल्या आहेत. येत्या १७ तारखेपर्यंत पावसाची ही स्थिती कायम राहणार असल्याची हवामानतज्ज्ञांनी वर्तविली. त्यामुळे सलग तीन वर्षांपासून दुष्काळ अन् नापिकीने आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकरी पुन्हा दुष्काळाच्या स्थितीने धास्तावला आहे.
मूग, उडीद पिके बाद होणार
यंदाच्या हंगामात पावसाळ्याच्या ४० दिवसानंतरही पेरणीयोग्य पाऊस नसल्याने अल्प कालावधीतील मूग, उडीद आदी पिके बाद होणार आहेत. जिल्ह्यात उडिदाचे क्षेत्र ११ हजार ९७८ हेक्टर असून, आतापर्यंत ५ हजार ३४५ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. तर मुगाचीही पेरणीही केवळ १२ हजार १८० हेक्टर क्षेत्रावर झाली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात पावसाने जून अखेरीची सरासरीही गाठलेली नाही. ३० जूनपर्यंत १४३.६ मिमी पाऊस अपेक्षित होता; मात्र प्रत्यक्षात १३३.२ मिमी पाऊस झाला तर ११ जुलैपर्यंत केवळ २१६.२ मिमी पाऊस झालेला आहे. या आठवड्यात वातावरण ढगाळलेले असताना पाऊस मात्र बेपत्ता आहे. त्यामुळे अर्ध्याअधिक क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या आहेत. जमिनीत आर्द्रता नाही. भूजलात प्रचंड घट आहे. सिंचन विहिरींनी तळ गाठलेला आहे. ही स्थिती यंदाही दुष्काळाची चाहूल देणारी असल्याने सद्यस्थितीत बळीराजा धास्तावला आहे.
जलसाठ्यात घट!
अकोला शहराची जीवनरेखा बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा मोठ्या धरणात केवळ ४.७५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. तेल्हारा तालुक्यातील वान धरणात २६.२८ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम प्रकल्पात शून्य टक्के, उमा शून्य टक्के, घुंगशी बॅरेज शून्य टक्के जलसाठा असून, मोर्णा धरणात आजमितीस ११.३९ टक्के जलसाठा आहे.
जुलैअखेरपर्यंत कपाशी, सोयाबीनची पेरणी
पावसाच्या उशिरामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर ६० दिवसांच्या कालावधीतल्या मूग व उडीद पिकाची पेरणी करता येणार नाही. सोयाबीन व येणारे कपाशीचे पीक घेता येणार आहे. सुधारित कपाशीच्या देशी सरळ वाणाची पेरणी करावी. यामध्ये २५ टक्के जादा बियाण्यांचा वापर व २५ टक्के कमी खतांचा वापर करावा, अशी माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली आहे.