मद्यधुंद मित्रांमुळे नवरदेवाने घोडा सोडून काढला पळ !
By admin | Published: May 4, 2017 12:00 AM2017-05-04T00:00:50+5:302017-05-04T00:00:50+5:30
वरातीत मद्यधुंद मित्रांनी घातला वाद : दुसऱ्या गटातील युवक आले अंगावर धावून
ऑनलाइन लोकमत
अकोला : दारू प्राशन केल्यामुळे अनेकांना सर्वशक्तिमान असल्याचा भास होतो आणि यातून अनर्थ घडतात. असाच एक हास्यास्पद प्रसंग बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास किल्ला चौकात घडला. आपल्या मित्रांच्या लग्नाच्या वरातीमध्ये सहभागी झालेल्या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मित्रांनी दुसऱ्या गटातील युवकांसोबत वाद घालल्याने, संतप्त युवक वरातीमधील मद्यधुंद युवकांवर चालून आल्यामुळे नवरदेवाला घोडा सोडून घरी पळ काढावा लागला.
शिव नगरात राहणाऱ्या युवकाचा लग्न समारंभ असल्याने, बुधवारी रात्री नवरदेव झालेल्या युवकाची बुधवारी रात्री घोड्यावरून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. लग्न हा आनंदाचा क्षण असल्याने, नवरदेवाच्या मित्रांनी चांगलीच दारू ढोसली आणि मिरवणुकीत डीजेच्या तालावर नाचण्यासाठी सहभागी झाले. रात्री दहा वाजल्याने जुने शहर पोलिसांनी किल्ला चौकात मिरवणूक अडवली आणि डीजे बंद करण्यास सांगितला. त्यामुळे मद्यधुंद अवस्थेतील नवरदेवाचे मित्र नाराज झाले. त्यांनी पोलिसांसोबतही हुज्जत घालली. नवरदेवाने त्यांची समजूत काढली; परंतु पोलिसांनी डीजे वाजविण्यास मनाई केल्याची खुमखुमी मद्यधुंद मित्रांमध्ये होतीच. त्यांनी चौकातील दुसऱ्या एका युवकाच्या गटासोबत वाद घातला. शिवीगाळ केली. त्यामुळे संतप्त झालेल्या दुसऱ्या गटातील युवकांनी आणखी युवकांना गोळा केले आणि मारहाण करण्याच्या उद्देशाने वरातीमधील मद्यधुंद युवकांच्या अंगावर चालून गेले. हाणामारीचा प्रसंग उद्भवला; परंतु नवरदेवाने या मद्यधुंद मित्रांमुळे आपल्याला विनाकारण मार खावा लागेल आणि पुन्हा हळद लावावी लागेल, लग्न राहील बाजूला आणि रुग्णालयात विनाकारण भरती व्हावे लागेल, असा विचार केला आणि या भानगडीत न पडता घोडा सोडून एका मित्राच्या मोटारसायकलवर घरी पळ काढला; परंतु चौकात पोलीस तैनात असल्याने त्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी दोन्ही गटांतील वाद मिटविला.