शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे जि.प. शाळेचा कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:57 AM2021-01-08T04:57:16+5:302021-01-08T04:57:16+5:30
अकोट : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा प्राथमिक सोयीसुविधांपासून वंचित असतात. विद्यर्थ्यांना आधुनिक काळात मूलभूत सुविधांचा अभाव असतो; ...
अकोट : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा प्राथमिक सोयीसुविधांपासून वंचित असतात. विद्यर्थ्यांना आधुनिक काळात मूलभूत सुविधांचा अभाव असतो; परंतु तालुक्यातील लोतखेड येथील शिक्षकांनी पुढाकार घेत शाळेचा कायापालट केला आहे. आता या शाळेचे रूप पालटले असून, विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासोबत विविध सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
तालुक्यातील लोतखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भिंतींवर सुंदर, आकर्षक पेंटिंग, शाळेतील बगिचा, बसण्यासाठी बेंच, स्वच्छता, प्रवेशद्वार आदी सुविधा उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांची पटसंख्याही सुधारली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात आजही जि.प. शाळेमध्ये सोयीसुविधांचा अभाव आहे. तसेच काही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचीही बिकट अवस्था झाली असून, भिंतीला तडे गेल्याचे चित्र आहेे; परंतु तालुक्यातील लोतखेड येथील जि.प. शाळेतील शिक्षकांनी पुढाकार घेत शाळेला मदत करू शकतील, अशा दानशूरांची माहिती घेत त्यांच्याशी संपर्क साधत मदतीची मागणी केली. शिक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी शिक्षकांसह १.५० लाख रुपयांची वर्गणी गोळा करून शाळेत विविध सुविधा उपलब्ध केल्या. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सविता गोरे, केंद्रप्रमुख रामदास होपळ, विष्णू झामरे,उर्दु शाळेचे मुख्याध्यापक मो.अझहरुद्दीन, इफ्फत मॅडम यांनी परिश्रम घेतले. शाळेच्या विकासासाठी गावातील मोहन कडू, सरपंच कुलदीप वसू, मराठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश झटाले, उर्दू शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फिरोज पठाण यांच्यासह ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत. (फोटो)