तुरुंगात जाण्याच्या भीतीने वृद्धाने घेतले जाळून
By admin | Published: October 31, 2014 01:28 AM2014-10-31T01:28:51+5:302014-10-31T01:28:51+5:30
अकोला येथील घटना, ८४ टक्के भाजल्याने वृद्धाचा मृत्यू.
अकोला: तुरुंगात जाण्याच्या भीतीने खडकी भागातील ६५ वर्षीय वृद्धाने जाळून घेतल्याची घटना बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. घटनेमध्ये वृद्ध ८४ टक्के भाजल्याने, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; परंतु गुरुवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुरुवारी खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास हाती घेतला आहे.
मृत्यू पावलेल्या वृद्धाचे शिवलाल पांडुरंग सुकळीकर असे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी शिवलाल सुकळीकर यांची सून आरती हिने जाळून घेतले होते. यात आरतीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तिच्या माहेरच्याकडील मंडळींनी पती संतोष सुकळीकर, सासरे शिवलाल, सासू, दीर बंडू सुकळीकर यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४९८ व इतर कलमांसह गुन्हा केला होता. त्यानंतर पोलिसांनी प्रकरण न्यायप्रविष्ट केले. या प्रकरणाचा गुरुवारी निकाल लागण्याची शक्यता असल्याने, शिवलाल सुकळीकर हे तणावात होते. निकाल कुटुंबाच्या विरोधात लागला तर आपल्याला तुरुंगात जावे लागेल, अशी भीती त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झाली. या भीतीपोटीच त्यांनी अंगावर रॉकेल घेऊन स्वत:ला जाळून घेतले. यात ते ८४ टक्के भाजले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला.