देयकाच्या भीतीने अर्थ विभागाला टाळे

By admin | Published: April 12, 2017 02:05 AM2017-04-12T02:05:45+5:302017-04-12T02:05:45+5:30

अकोला: जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात ३१ मार्चपर्यंत दाखल कामाची देयके स्वीकारून त्याची केवळ आवकमध्ये नोंद घ्यावी, या मागणीसाठी कंत्राटदारांनी वित्त विभागात धाव घेतली.

Due to the fear of payment the Department of Finance | देयकाच्या भीतीने अर्थ विभागाला टाळे

देयकाच्या भीतीने अर्थ विभागाला टाळे

Next

कंत्राटदारांसह सदस्यांनाही कॅफो नागर यांचा नकार

अकोला: जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात ३१ मार्चपर्यंत दाखल कामाची देयके स्वीकारून त्याची केवळ आवकमध्ये नोंद घ्यावी, या मागणीसाठी कंत्राटदारांनी वित्त विभागात धाव घेतली. त्यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर यांनी कार्यालयातील सर्वांना काम बंद करून कुलूप लावण्याचे फर्मान सोडत कार्यालयातून बाहेर पडल्या. जिल्हा परिषद सदस्य नितीन देशमुख यांनी त्यांची गाडी थांबवत रस्त्यावरच चर्चा केली.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे प्राप्त देयके अदा करण्यासाठी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.जी. गावंडे यांनी ३१ मार्च रोजी वित्त विभागाला पत्र दिले होते.
त्यावेळी विभागाची आवक-जावक नोंदवही मुख्य लेखा व वित्त अधिकारी नागर यांच्याकडे असल्याने देयक स्वीकारत नाही, तसेच त्याची पोचही देण्यात आली नाही. त्या दिवसांपासून ती देयके बांधकाम विभागातच पडून आहेत. ती देयके वित्त विभागाने स्वीकृत करावी, यासाठी कंत्राटदारांनी मंगळवारी धाव घेतली; मात्र मुख्य लेखा व वित्त अधिकारी नागर यांनी देयकाची आवकमध्ये नोंद करणे, स्वीकारण्यालाही नकार दिला. त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत, त्यांनी थेट कार्यालयाला कुलूप लावण्याचे फर्मान सोडले. तसेच बाहेर पडल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनीही तेथे हजेरी लावली. बाहेर जाणाऱ्या मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांची गाडी थांबवत त्यांच्याशी रस्त्यावरच चर्चा केली. चर्चेअखेर नागर यांनी देयक स्वीकारली. त्यासाठी आवक वहीमध्ये नोंद घेण्याची मागणी केली असता नोंदवही मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांकडेच असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे देयके अदा करणे थांबले आहे.

वित्त विभागात रात्रीच्या अंधारात काम
दिवसभरातील गदारोळानंतर रात्री उशिरा नऊ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी गीता नागर यांच्यासह काही निवडक कर्मचाऱ्यांनी कार्यालय गाठले. कार्यालयात दिवे लावल्यानंतर वित्त विभागाच्या मुख्य द्वाराला आतून कुलूप लावण्यात आले. त्यामुळे बाहेरच्या कुणालाही आतमध्ये काय सुरू आहे, याबाबत काहीच माहिती नव्हती. रात्रीच्या अंधारात वर्षभरातील काळेबेरे काम पांढरे झाल्याची चर्चा होती.

बांधकामने झटकली जबाबदारी
बांधकाम विभागाने ३१ मार्चपासून सातत्याने पाठवलेली देयके वित्त विभागाने स्वीकारली नाही. त्यामुळे ती देयके अदा करण्यात आली नाही. देयकांची अदायगी न झाल्यास जबाबदारी मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांची राहील, असे पत्र बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गावंडे यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवार यांना दिले.

आयुक्तांकडे नागर यांच्या तक्रारी
अर्थ सभापती पुंडलिकराव अरबट यांच्या तक्रारीनंतर आता सदस्य नितीन देशमुख यांनीही मंगळवारी विभागीय आयुक्तांकडे नागर यांची तक्रार केली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी आणखीच वाढणार आहेत.

Web Title: Due to the fear of payment the Department of Finance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.