बहावा बहरल्याने यंदा वेळेवर, चांगला पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 01:31 AM2018-04-11T01:31:56+5:302018-04-11T01:31:56+5:30

यावर्षी बहावा वनस्पतीला सर्वत्रच मोठय़ा प्रमाणात बहार आला आहे. यावरून यंदाचा पाऊस वेळेवर आणि चांगला होईल, असे संकेत मिळाले आहेत. अशी माहिती वनस्पती शास्त्रज्ञ  डॉ. सहदेव रोठे यांनी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

Due to the flooding, timely, good rain! | बहावा बहरल्याने यंदा वेळेवर, चांगला पाऊस!

बहावा बहरल्याने यंदा वेळेवर, चांगला पाऊस!

Next
ठळक मुद्देवनस्पती शास्त्रज्ञांचा दावाविविध वनस्पतींच्या फुलण्यावरून मिळतात पावसाचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पूर्वीच्या काळी पावसाचा अंदाज घेण्यासाठी कोणती आधुनिक साधने, यंत्रसामग्री नव्हती; परंतु निसर्गच पावसाच्या आगमनाचा संकेत द्यायचा आणि आताही निसर्ग तेच काम करतो. त्यामुळे शेतकर्‍याला  पावसाचा अंदाज घेता येत असे. निसर्गातील प्रत्येक झाडाचा फुले, फळे येण्याचा एक विशिष्ट काळ आहे. काही झाडे, वनस्पतींचे काही गुण आहेत. यावर्षी बहावा वनस्पतीला सर्वत्रच मोठय़ा प्रमाणात बहार आला आहे. यावरून यंदाचा पाऊस वेळेवर आणि चांगला होईल, असे संकेत मिळाले आहेत. अशी माहिती वनस्पती शास्त्रज्ञ  डॉ. सहदेव रोठे यांनी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 
सध्या वैज्ञानिक युगामध्ये पाऊस कधी येणार, हे सांगणारी यंत्रणा, हवामानशास्त्र प्रगत असले, तरी ग्रामीण भागातील शेतकरी, आदिवासी बांधव हे अनेक गोष्टींवरून पाऊस लवकर येणार की उशिरा येणार, याचा अंदाज घेतात. निसर्गच पावसाच्या आगमनाची चाहूल देतो. अनेक वनस्पती या नैसर्गिक बदलाचे संकेत, संदेश देतात. 
बहावा ही आकर्षक पिवळय़ा रंगाची फुले येणारी वनस्पती आहे. बहावा फुलण्याचा मार्च ते मे हा काळ आहे. एप्रिल महिन्यात बहावा ही वनस्पती पूर्णत: फुलून येते; परंतु यंदा बहावा ही वनस्पती मोठय़ा प्रमाणात बहरली आहे. यावरून पावसाचा अंदाज काढता येतो. 
यंदा वेळेवर आणि चांगला पाऊस होण्याचे संकेत बहावा वनस्पतीने दिले आहेत. निसर्गामध्ये अनेक वनस्पती, झाडे आहेत. त्यांच्या बहरण्यावरून पावसाचा अंदाज काढता येतो. मोह फुले बहरण्यावरून आदिवासी बांधव पावसाचा अंदाज काढतात. त्याचप्रमाणे बहावा या झाडाला किती फुले, यावरून यावर्षी किती प्रमाणात पाऊस पडणार किंवा पावसाळा कसा राहील, याचा अंदाज काढल्या जातो. 

यावरूनही मिळतात पावसाचे संकेत
अनेक पक्षी पावसाचे संकेत देतात. काही पक्षी त्यांची घरटी झाडाच्या वरच्या टोकाला साकारत असतील, तर यावरून निश्‍चितपणे पाऊस भरपूर येण्याचा अंदाज काढल्या जातो. मोहा बहरल्यावर आदिवासी बांधव ही फुले एक पानांची परडी तयार करून ते नदी, तलावामध्ये सोडतात. परडी किती दूर गेली, यावरूनही पावसाचा अंदाज ठरवितात. 

या वनस्पती देतात संकेत
- दैनंदिन पाहणी व अभ्यासातून झाडांचे वैशिष्ट्य, गुण आपल्याला दिसून येतात.   सोनमोहोर या झाडाला दसर्‍याच्या वेळेस फुले येतात. त्यामुळे सोनमोहोर फुलून दसर्‍याचे स्वागत करतो, असा समज लोकांमध्ये आहे. 
- त्याचप्रमाणे काशीद या झाडाला फुलांचा बहर हा रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये येत असल्याने मुस्लीम बांधवांमध्ये आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी काशीद झाडाला बहर येतो, असा समज असल्याचे मानले जाते. 
-होळी उत्सवादरम्यान पळसाला बहर येतो. मार्च, एप्रिल महिन्यात जंगलातील अनेक झाडांना फुले, मोहर येतो. त्यामुळे आदिवासी, गावकरी या फुलांच्या मोहरावरून पर्जन्यमानाचा अंदाज घेतात. 

प्रत्येक झाडाचा फुले, फळे येण्याचा एक विशिष्ट काळ आहे. अनेक झाडे, वनस्पती निसर्गाशी संबंधित संदेश देतात; परंतु त्याला वैज्ञानिक आधार नसला, तरी एक प्रचलित मान्यता आहे. यंदा बहावा ही वनस्पती मोठय़ा प्रमाणात बहरली आहे. त्यांच्या फुलांच्या बहरावरून यंदा पाऊस वेळेवर व चांगला होण्याचे संदेश मिळतात. 
- डॉ. सहदेव रोठे, वनस्पती शास्त्रज्ञ
प्राचार्य, मेहरबानो महाविद्यालय.

Web Title: Due to the flooding, timely, good rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला