करवाढीमुळे अकोला मनपाच्या उत्पन्नात ९0 कोटींची भर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 02:27 AM2018-03-29T02:27:05+5:302018-03-29T02:27:05+5:30
अकोला : मनपा प्रशासनाने ‘जीआयएस’प्रणाली’द्वारे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केले. मोजमाप करताना ३३ हजार मालमत्ता धारक कर जमा करीत नसल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले. १८ वर्षांमध्ये मनपाने कधीही करवाढ न केल्यामुळे यंदा प्रशासनाने सुधारित करवाढ लागू केली. त्यामुळे मनपाच्या उत्पन्नात थेट ९०.५५ कोटींची लक्षणीय वाढ झाली. स्थानिक संस्था कर व मुद्रांक शुल्क ६ कोटी, विशेष पाणीपट्टी १५ कोटी, हार्डशिप कम्पाऊंडिंग १० कोटी, स्थानिक संस्था कर अनुदान ६८.५० कोटी व इतर उत्पन्नासह मनपाच्या महसुली उत्पन्नाने २२३.९५ कोटींचा पल्ला गाठला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मनपा प्रशासनाने ‘जीआयएस’प्रणाली’द्वारे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केले. मोजमाप करताना ३३ हजार मालमत्ता धारक कर जमा करीत नसल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले. १८ वर्षांमध्ये मनपाने कधीही करवाढ न केल्यामुळे यंदा प्रशासनाने सुधारित करवाढ लागू केली. त्यामुळे मनपाच्या उत्पन्नात थेट ९०.५५ कोटींची लक्षणीय वाढ झाली. स्थानिक संस्था कर व मुद्रांक शुल्क ६ कोटी, विशेष पाणीपट्टी १५ कोटी, हार्डशिप कम्पाऊंडिंग १० कोटी, स्थानिक संस्था कर अनुदान ६८.५० कोटी व इतर उत्पन्नासह मनपाच्या महसुली उत्पन्नाने २२३.९५ कोटींचा पल्ला गाठला. त्यामध्ये भांडवली जमा (शासन निधी) ११०.६० कोटी व असाधारण ऋण निलंबन लेखे अंतर्गत १०६.८५ कोटी अशा एकूण ४४१.४० कोटींमध्ये चालू आर्थिक वर्षातील शिल्लक ९ कोटी ३१ लाखाचा समावेश केल्यामुळे उत्पन्नाने ४५०.७१ कोटींचा पल्ला गाठल्याचे समोर आले.
दरम्यान, शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी शहरातील स्मशानभूमी व जुने शहरातील दफनभूमीचा विषय लावून धरला. गुलजारपुरास्थित हिंदू दफनभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाच शिल्लक नसून, स्थानिक अतिक्रमकांनी दफनभूमीच्या जागेवर घरे बांधल्याचे राजेश मिश्रा यांनी सांगितले. स्मशानभूमी व दफनभूमीच्या विकासासाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी मिश्रा यांनी केली असता, महापौर विजय अग्रवाल यांनी मान्य केली. मुंबई मनपाप्रमाणे ५०० चौरस फुटावर घर बांधणाऱ्या अकोलेकरांना करातून सूट देण्याची मागणी त्यांनी केली. असदगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी, स्मशानभूमीत चपराशी नियुक्ती करून महान धरणाला पर्याय म्हणून वाण धरणाचा विचार करण्याची सूचना राजेश मिश्रा यांनी मांडली.
अजय शर्मा, अनिल गरड आक्रमक
जलवाहिन्या, सबमर्सिबल पंप, हातपंपांच्या दुरुस्तीच्या मुद्यावरून भाजप नगरसेवक अजय शर्मा तसेच जलवाहिनीचे जाळे टाकणाºया कंपनीच्या कामकाजावरून भाजप नगरसेवक अनिल गरड यांनी प्रशासनावर चांगलाच संताप व्यक्त केला. सफाई कर्मचाºयांच्या अनुपस्थितीवर अनिल गरड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरात अनधिकृत होर्डिंगच्या संख्येत वाढ झाली असून, प्रशासनाला लाखो रुपयांचा चुना लावल्या जात असल्याचे अजय शर्मा यांनी नमूद केले. यासंदर्भात निश्चित धोरण आखण्यात आल्याची माहिती आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिली. सभागृहात नगरसेवक सतीश ढगे, अमोल गोगे, गजानन चव्हाण, मंजूषा शेळके, उषा विरक, सुजीत ठाकूर, शशी चोपडे, जयश्री दुबे, जान्हवी डोंगरे आदींनी सूचना मांडल्या.
पत्रकारांसाठी ३० लाखांची तरतूद
अनेकदा जीव धोक्यात घालून पत्रकार वार्तांकन करतात. शासनमान्य संघटनेच्या व मनपा क्षेत्रातील रहिवासी असणाºया वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, चॅनेल्सचे प्रतिनिधी यांचा दुर्दैवाने अपघात किंवा मृत्यू झाल्यास तसेच आजारासाठी प्रशासनाने आर्थिक मदतीसाठी ३० लाख रुपये तरतूद करण्याची सूचना भाजपाचे गटनेता राहुल देशमुख यांनी केली असता, महापौर विजय अग्रवाल यांनी यासंदर्भात सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.