प्रवेशपत्र डाउनलोड न झाल्यामुळे पाचशेच्यावर विद्यार्थी परीक्षेपासून वंचित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 01:00 PM2019-04-07T13:00:54+5:302019-04-07T13:01:02+5:30
अकोला: जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावी प्रवेशासाठी शनिवारी जिल्ह्यातील १८ केंद्रांवर परीक्षा पार पडली; परंतु परीक्षेचे प्रवेशपत्र अखेरपर्यंत डाउनलोड न झाल्यामुळे जिल्ह्यातील पाचशेच्यावर विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले.
अकोला: जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावी प्रवेशासाठी शनिवारी जिल्ह्यातील १८ केंद्रांवर परीक्षा पार पडली; परंतु परीक्षेचे प्रवेशपत्र अखेरपर्यंत डाउनलोड न झाल्यामुळे जिल्ह्यातील पाचशेच्यावर विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. त्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)च्यावतीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात येते. जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयाच्या २0१९-२0 च्या इयत्ता सहावीमध्ये प्रवेशासाठी जिल्ह्यातून ५ हजार ५३३ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरले होते; परंतु शेकडो विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज डाउनलोड न झाल्यामुळे त्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. प्रवेशपत्र मिळत नसल्याने पालकांनी स्थानिक स्तरावर तक्रारसुद्धा केली; परंतु ही प्रक्रिया केंद्रीय शिक्षण माध्यमिक मंडळाकडून होत असल्याने, स्थानिक स्तरावर जवाहर नवोदय विद्यालय प्रशासनाला कोणताही निर्णय घेता आला नाही. त्यामुळे ५ हजार ५३३ विद्यार्थ्यांपैकी ४ हजार ९९१ विद्यार्थ्यांनाच परीक्षा देता आली. इयत्ता सहावी वर्गाच्या प्रवेशासाठी जिल्ह्यातील १८ परीक्षा केंद्रांवर शनिवारी नवोदयची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल मे महिन्यात लागणार असून, यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बाभूळगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता सहावीच्या ८0 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. (प्रतिनिधी)
यंदा प्रथमच विद्यार्थ्यांकडून आॅनलाइन अर्ज मागविले होते. पहिल्या टप्प्यात नोंदणी आणि दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांची कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले होते; परंतु शेकडो विद्यार्थ्यांची कागदपत्रे अपलोड न झाल्यामुळे त्यांना प्रवेशपत्रापासून वंचित राहावे लागले.
-मिलिंद बनसोडे,
परीक्षा प्रमुख, जवाहर नवोदय विद्यालय.