सत्तेच्या पाठबळाअभावी, साहित्यिकांच्या उदासीनतेमुळे मराठी भाषा अभिजात दर्जापासून वंचित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:22 PM2019-02-27T12:22:12+5:302019-02-27T12:22:43+5:30
सत्तेच्या पाठबळाचा अभाव, साहित्यिकांची उदासीन, असलेले मतभेद यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळू शकला नसल्याची खंत अकोल्यातील ज्येष्ठ साहित्यिक, कवींनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
अकोला: कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. मराठी भाषा ही चिरंतन आहे. मराठी ही मातृभाषा आहे. तिला अभिजात दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे; परंतु सत्तेच्या पाठबळाचा अभाव, साहित्यिकांची उदासीन, असलेले मतभेद यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळू शकला नसल्याची खंत अकोल्यातील ज्येष्ठ साहित्यिक, कवींनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
तमिळ भाषेसह संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि ओडिया आदी भाषांना अभिजात दर्जा मिळतो. केंद्र सरकारने कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी प्रामुख्याने श्रेष्ठता हाच निकष लावला आहे. प्राचीनता, श्रेष्ठता, स्वयंभूपणा आणि सलगता हे या दर्जासाठीचे चार निकष आहेत. मराठी भाषा हे चारही निकष पूर्ण करीत असूनही तिला अभिजात दर्जा मिळण्यासाठी झगडावे लागत आहे. हेच दुदैव असल्याचे मतही ज्येष्ठ साहित्यिकांनी व्यक्त केले.
सत्तेचे पाठबळ आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळत नाही. साहित्य संमेलने घेण्याचा उत्साह असतो; परंतु मराठी भाषेविषयी मात्र, निरुत्साह दिसून येतो. साहित्यिकांमध्ये मतभेद, गटतट आहेत. स्वत:च्या कामासाठी साहित्यिक राजकीय नेत्यांकडे चकरा घालतात; परंतु मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी कोणी आग्रही दिसत नाही. हा मुद्दाही सातत्याने लावून धरल्या जात नाही. हिंदी, दाक्षिणात्य भाषिकांसारखी तडफच आमच्यात नाही. आणि मराठीला अभिजात दर्जा मिळाला तर त्याने काय फरक पडेल. मानसिक समाधान मिळेल. तेवढेच.
-नारायण कुळकर्णी कवठेकर, प्रसिद्ध कवी
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याविषयीचा निर्णय शासनस्तरावरील आहे. शासनाने प्रयत्न केले तर अभिजात दर्जा मिळणे शक्य आहे. दरवर्षी मराठी राजभाषा दिनाला आम्ही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळेल, याची वाट पाहतो; परंतु निराशाच पदरी पडते. अमृतापेक्षाही मधुर अशी मराठी भाषा आहे; परंतु मराठीला अभिजात दर्जा मिळविण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा. साहित्यिकांनाही त्यासाठी पुढाकार घ्यावा.
-सीमा रोठे (शेट्ये) कार्याध्यक्ष
विदर्भ साहित्य संघ, अकोला शाखा
मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे, यासाठी केवळ तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी प्रयत्न केले होते; परंतु त्यानंतर एकाही राजकीय नेत्याला प्रयत्न करावासा वाटला नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळो अथवा न मिळो, त्यापेक्षा मराठी भाषा व शाळांचा शैक्षणिक दर्जा कसा सुधारेल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. या प्रयत्नातूनच मराठी भाषेचे अस्तित्व टिकून राहील.
- श्रीकांत तिडके, माजी सदस्य
भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र शासन
प्राचीन अशा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी झगडावे लागते, हे दुर्दैव आहे. राजकीय नेतेसुद्धा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याविषयी उदासीन आहेत. आमच्यावर हिंदी व इंग्रजी भाषेचा प्रभाव असल्यामुळे मराठीला आम्ही दुय्यम समजतो. मातृभाषा असूनही मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यात केंद्र स्तरावर आमचे राजकीय नेते, साहित्यिक मंडळी कमी पडतात.
डॉ. रामेश्वर भिसे, प्राचार्य,
श्री शिवाजी महाविद्यालय