वाढत्या थंडीमुळे ‘हार्ट अटॅक’चा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 01:32 PM2019-01-29T13:32:13+5:302019-01-29T13:32:30+5:30
अकोला : थंडीचा मौसम आरोग्यदायी मानल्या जातो; परंतु याच थंडीच्या दिवसांत ‘हार्ट अटॅक’चा धोकाही जास्त असतो. पूर्वी वयाच्या चाळिशीनंतर येणारा हृदयविकाराचा झटका आता चक्क तिशीनंतरही त्याचा धोका वाढला आहे.
- प्रवीण खेते
अकोला : थंडीचा मौसम आरोग्यदायी मानल्या जातो; परंतु याच थंडीच्या दिवसांत ‘हार्ट अटॅक’चा धोकाही जास्त असतो. पूर्वी वयाच्या चाळिशीनंतर येणारा हृदयविकाराचा झटका आता चक्क तिशीनंतरही त्याचा धोका वाढला आहे. म्हणूनच थंडीच्या दिवसांत योग्य ती सतर्कता घेण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
आरोग्याच्या दृष्टिकोनातून हिवाळा हा ऋतू सर्वांसाठीच हितकारी ठरतो; पण त्याचसोबत अस्थमा, त्वचा विकाराच्याही समस्या या दिवसांत वाढतात. योग्य काळजी घेतल्यास या समस्यांवरही मात करणे शक्य आहे; परंतु वयाच्या चाळिशीनंतरच्या व्यक्तींना या दिवसांत हार्ट अटॅकचा जास्त धोका असतो. मागील दशकात जीवनशैलीमध्ये झालेल्या बदलांमुळे हा धोका वयाच्या तिशीनंतरच जाणवू लागला आहे. थंडीमुळे हृदयाला आवश्यक रक्त पुरवठा होत नसल्याने या दिवसांत हार्ट अटॅकमुळे मृत्यूचे प्रमाणही एरवीपेक्षा जास्त असते. त्याला आपल्या काही चुकीच्या सवयीदेखील कारणीभूत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. अशा परिस्थितीत स्वत:चा बचाव करायचा असेल, तर योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
रात्री ३ ते पहाटे ६ धोक्याची घंटा
थंडीच्या दिवसांत हार्ट अटॅकचा धोका संभावतो; परंतु रात्री ३ ते पहाटे ६ वाजताच्या सुमारास त्याचा सर्वाधिक धोका असतो.
नेमकं काय होतं?
हिवाळ्यात थंड पाण्याचे सेवन केल्याने शरीराचे तापमान प्रभावित होते. शिवाय, या दिवसांत हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. परिणामी, हृदयाला आवश्यक रक्त पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो आणि ‘हार्ट अटॅक’चा धोका संभोवतो.
अशी घ्या सतर्कता
- थंड पाणी पिण्याचे टाळा.
- रात्रीच्या जेवणानंतर लगेच बाहेर जाणे टाळा.
- शरीराचे तापमान संतुलित राखा.
- नियमित व्यायाम करा.
- मॉर्निंग किंवा इव्हिनिंग वॉक करा.
- ऊबदार वस्त्रे परिधान करा.
- चरबीयुक्त पदार्थाचे सेवन टाळा.
थंडीच्या दिवसांत हृदयाला रक्त पुरवठा करणाºया रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे हृदयाचा झटका येण्याची शक्यता असते. हिवाळ्यात हे प्रमाण वाढत असून, वयाच्या तिशीनंतर हा धोका सर्वाधिक आहे. त्यामुळे नियमित व्यायाम व योग्य आहाराचे सेवन करा.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला.