जिल्ह्यात सेविकांच्या संपामुळे अंगणवाडी केंद्रे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 02:15 AM2017-10-07T02:15:04+5:302017-10-07T02:15:38+5:30
अकोला : राज्यभरातील अंगणवाडी सेविका सध्या महिनाभरापासून त्यांच्या विविध संपावर आहेत. त्यामुळे त्यांच्या संप काळात शासनाने आशा सेविकांना बालकांना पोषण आहाराचे वितरण करण्याचे आदेश दिले आहेत. तथापि, अंगणवाडी सेविकांच्या असहकार्याच्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील बहुसंख्य अंगणवाडी केंद्र बंद असून, काही ठिकाणी आशा सेविका अंगणवाडी केंद्राबाहेर उघड्यावर बालकांना पोषण आहाराचे वितरण करीत आहेत; मात्र बहुतांश बालक पोषण आहारापासून वंचित राहत असल्याची वस्तुस्थिती ‘लोकमत’ने ६ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील महत्त्वाच्या व मोठय़ा गावात केलेल्या स्टिंग ऑपरेशनने उघडकीस आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्यभरातील अंगणवाडी सेविका सध्या महिनाभरापासून त्यांच्या विविध संपावर आहेत. त्यामुळे त्यांच्या संप काळात शासनाने आशा सेविकांना बालकांना पोषण आहाराचे वितरण करण्याचे आदेश दिले आहेत. तथापि, अंगणवाडी सेविकांच्या असहकार्याच्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील बहुसंख्य अंगणवाडी केंद्र बंद असून, काही ठिकाणी आशा सेविका अंगणवाडी केंद्राबाहेर उघड्यावर बालकांना पोषण आहाराचे वितरण करीत आहेत; मात्र बहुतांश बालक पोषण आहारापासून वंचित राहत असल्याची वस्तुस्थिती ‘लोकमत’ने ६ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील महत्त्वाच्या व मोठय़ा गावात केलेल्या स्टिंग ऑपरेशनने उघडकीस आली आहे.
आगर परिसरात अंगणवाडीमध्ये खिचडी वाटप बंद!
आगर : अंगणवाडी मदतनीस, सेविका गेल्या महिन्यापासून आपल्या मागण्यांसाठी संपावर गेल्याने महिनाभरापासून खिचडी शिजत नसल्याने अंगणवाडीतील चिमुकले आहारापासून वंचित राहत असल्याची वस्तुस्थिती ६ ऑक्टोबर रोजी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये दिसून आली.
मागील महिन्यापासून अंगणवाडी सेविका, मदतनीस त्यांच्या विविध मागण्यांसाठी संपावर गेल्याने जिल्हा प्रशासनाने आहार पुरवण्याची जबाबदारी आशा सेविकांकडे सोपविली आहे. यामध्ये अनेक आशा सेविका आहार वाटण्यास राजी नाहीत. अशावेळी अंगणवाडीला आहार पुरवठा करण्याची जबाबदारी महिला बचत गटाकडे सोपविली जात असली, तरी अनेक ठिकाणी बचत गटांकडूनही नकार मिळत आहे. अशाप्रकारे अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या संपाला आशा सेविका व बचत गटांचा अघोषित पाठिंबा असल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे. यासंदर्भात शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आगरसह खांबोरा, पाळोदी, खेकडी, उगवा येथेही बालकांना पोषण आहाराचे वाटप बंद असल्याचे दिसून आले.
आशा सेविकांवर दबाव
अंगणवाडी सेविकांचा संप मिटत नसल्याचे पाहून प्रशासनाने आशा सेविकांना आहार पुरवठा करण्याचे लेखी आदेश दिले आहेत; पण अनेक आशांनी विरोध केल्याने त्यांना कामावरून कमी करण्याचा इशारा देण्यात आला आहे. काही आशा सेविकांनी अंगणवाडीतील बालकांना पोषण आहाराचे वाटप करणे म्हणजे दुसर्याच्या घरात घुसण्याचा प्रकार असल्याचे मत बोलून दाखविले आहे. या प्रकाराकडे शासनाने लक्ष घालून सेविका संप मिटवावा व आहार पूर्ववत व्हावा, यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वाडी अदमपूरमध्ये अंगणवाडी बंद
वाडी अदमपूर: तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येणार्या वाडी अदमपूर येथील अंगणवाडीसंदर्भात ६ ऑक्टोबर रोजी ‘लोकमत’ने स्टिंग ऑपरेशन केले असता संपकाळात अंगणवाडी बंद असल्याचे व तेथील बालक पोषण आहारापासून वंचित असल्याचे आढळून आले.
तसेच अंगणवाडी शाळेच्या आवारात गुरांचा संचार असल्याची बाब समोर आली. वाडी अदमपूर गावात तीन अंगणवाडी शाळेचे वर्ग आहेत.
११ सप्टेंबरपासून अंगणवाडी सेविकांच्या संपापासून या गावातील तीनही वर्ग बंद असल्याची माहिती समोर आली आहे. अंगणवाडी शाळा बंद असल्याने लहान बालकांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे.
अंगणवाडी सेविका वाटप करू देत नसल्याची आशांची तक्रार
वाडेगाव : वाडेगावात मागील एक महिन्यापासून अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे बालकांना पोषण आहार वाटप बंद आहे. शासनाने पोषण आहाराच्या वाटपाचे काम संप मिटेपर्यंत आशा सेविकांना करण्याचा आदेश दिला आहे. तथापि, अंगणवाडी सेविका आशा सेविकांना पोषण आहार वाटप करू देत नसल्यामुळे पोषण आहार वाटप बंद आहे. यामुळे अंगणवाडीतील बालक पोषण आहारापासून वंचित राहत आहेत.
वाडेगावात एकूण १४ अंगणवाडी केंद्र आहेत. त्यात २0 अंगणवाडी सेविका व २0 मदतनीस आहेत. सध्या अंगणवाडी सेविकांचा संप सुरू असल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार बालविकास प्रकल्प अधिकार्यांनी येथील १७ आशा स्वयंसेविकांना पोषण आहार वाटप करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार आशा सेविका २७ सप्टेंबर रोजी पोषण आहार वाटप करण्यासाठी गेल्या असता अंगणवाडी सेविकांनी त्यांना अंगणवाडीत येऊ दिले नाही, तसेच पोषण आहार वाटप करू नका, असे सांगून अडथळा आणला, अशी तोंडी तक्रार आशा सेविकांनी गटप्रवर्तकांकडे दिली आहे. यामुळे काही अंगणवाड्या चक्क बंद आढळल्या. परिणामी, कोणत्याही ठिकाणी आशा स्वयंसेविका पोषण आहाराचे वाटप करताना दिसून आल्या नाहीत. काही ठिकाणी बचत गटांना पोषण आहाराचे वाटप करण्यास सांगितले असल्याने काही अंगणवाड्यांमध्ये बचत गट पोषण आहाराचे वाटप करताना दिसून आले. त्यामुळे आशा सेविकांना आदेश देऊनसुद्धा त्या पोषण आहाराचे वाटप करू शकल्या नाहीत. कोणाच्या आदेशाचे पालन करावे, असा प्रश्न आशा सेविकांना पडला असल्याचे आशा स्वयंसेविकेच्या गटप्रवर्तक अर्चना मानकर यांनी सांगितले.
कुरुम येथे पोषण आहार वाटप बंद!
कुरूम : मूर्तिजापूर पं. स. अंतर्गत येत असलेल्या कुरूम येथील ८ अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी सेविकांच्या संपकाळात बालकांना दिला जाणारा पोषण आहार वाटप बंद आहे.
अंगणवाडी सेविका सध्या त्यांच्या विविध मागण्यांसाठी संपावर आहेत. या काळात शासनाने आशा सेविकांनी पोषण आहाराचे वाटप करावे, असा आदेश दिला आहे. त्यामुळे आशा सेविका अंगणवाडीतील बालकांना पोषण आहाराचे वाटप करीत आहेत काय, हे शोधण्यासाठी ‘लोकमत’ने ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १0.३0 ते १.३0 वाजताच्या दरम्यान कुरूम येथील आठही अंगणवाडी केंद्रात स्टिंग ऑपरेशन केले असता, तेथे पोषण आहाराचे वाटप पूर्णपणे बंद असल्याचे आढळून आले.
२४७ बालक पोषण आहाराविना
सिरसोली: येथे एकूण पाच अंगणवाडी केंद्रे असून, अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे मोजक्याच बालकांना वगळता उर्वरित २४७ बालकांना पोषण आहाराचे वाटप सद्यस्थितीत बंद असल्याची बाब ६ ऑक्टोबर रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आली आहे.
येथील पाच अंगणवाडी केंद्रांमध्ये शिकणार्या २७२ बालकांपैकी २५ बालकांना पोषण आहाराचे वाटप करण्यात येत आहे. उर्वरित २४७ बालकांना आहार वाटप सध्या बंद आहे. येथे पोषण आहार बचत गटामार्फत शिजविला जातो; परंतु २४७ बालकांना पोषण आहार वाटप केले जात नसल्यामुळे त्या बालकांना पोषण आहाराविना राहावे लागत असल्याची गावातील सर्व अंगणवाडी केंद्रांना भेट दिली असता, त्या बंद स्थितीत दिसल्या आहेत.
बचत गटामार्फत समाज मंदिराच्या ओट्यावर आहार वाटप
अडगाव बु.: गेल्या ११ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या संपात येथील १0 अंगणवाडी सेविकांपैकी आज रोजी ९ सेविका व ९ मदतनीस संपात सामील झालेल्या असल्याची माहिती पर्यवेक्षिका नागझरीकर यांनी दिली. येथील सर्वच अंगणवाड्यांमध्ये बचतगटाच्या मार्फत आहार देण्याचे काम दिलेले आहे. काही बचत गटाजवळ बालकांची यादी नसल्याने जमेल तेवढय़ा व माहिती असलेल्या बालकांना आहार वाटपाचे काम केल्या जात आहे. यामुळे बालकांची संख्या घटली.
अंगणवाड्या कुलूप बंद असल्याने कुठे अंगणवाडीसमोर, कुठे समाज मंदिरात तर कुठे ओट्यावर आहार वाटप केल्या गेला. दिलेला आहार हा बचत गटांनी घरूनच शिजवून आणला होता. अंगणवाड्या बर्याच दिवसांपासून बंद असल्याने बालकांना फक्त आहारापुरतेच अंगणवाडी परिसरात आणल्या जात असल्याचे दृश्य होते.