शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट !
By Admin | Published: June 25, 2017 01:48 PM2017-06-25T13:48:52+5:302017-06-25T13:48:52+5:30
वर्हाडात पावसाने दडी मारल्याने पेरण्या उलटण्याचे प्रमाण वाढले आहे.
शेतकरी हवालदिल ; बियाणे बाजारातील गर्दी ओसरली
अकोला : वर्हाडात पावसाने दडी मारल्याने पेरण्या उलटण्याचे प्रमाण वाढले आहे. येत्या दोन तीन दिवसात पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाच्या अनिच्छिततेचा परिणाम बियाणे बाजारावर झाली असून, शेतकर्यांनी अद्याप पुर्ण शंभर टक्के कृषी निविष्ठाची खरेदी केलेली नाही.
अमरावती,अकोला,बुलडाणा व वाशिम जिल्हयात जवळपास ५0 ते ५५ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. अकोला जिल्हयात १0 टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने यावर्षी चांगल्या पावसाचे भाकीत केल्याने पश्चिम विदर्भातील शेतकर्यांनी या आशेवर पहिल्याच पावसात जवळपास ५0 टक्के क्षेत्रावर पेरणी केली आहे; पण पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तापमानात वाढ झाल्याने पेरणी केलेली पिके कोमेजू लागली आहेत. पाण्याची थोडीफार उपलब्धता असलेल्या ठिकाणी तुषार सिंचनाद्वारे पिके जगविण्याचा प्रयत्न शेतकर्यांकडून केला जात आहे. येत्या दोन दिवसांत पाऊस न आल्यास पिके उलटण्याची भीती असल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, पश्चिम विदर्भातील पाच जिल्हय़ांत ३२ लाखांवर क्षेत्र खरीप हंगामाचे आहे. यातील अध्र्याच्यावर म्हणजेच १७ लाख हेक्टर क्षेत्र हे अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्हय़ात आहे. अकोला वगळता बुलडाणा व वाशिम जिल्हय़ात ५0 टक्के क्षेत्रावर शेतकर्यांनी खरीप पिकांची पेरणी केली आहे; पण पावसाने दडी मारल्याने अंकुरलेली पिके करपू लागली असून, उर्वरित पेरण्यांना विलंब होत आहे. पिकांना तातडीने पावसाची गरज असल्याने शेतकर्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील ४ लाख १३ हजार हेक्टरवर कृषी विभागाने पेरणीचे नियोजन केले आहे. त्यातील २ लाख ५0 हजार हेक्टरवर शेतकर्यांनी पेरणी केली आहे. हे क्षेत्र ५१ टक्के आहे. बुलडाणा जिल्हय़ातील ७ लाख ४७ हजार ५७८ हेक्टर क्षेत्र खरीप हंगामातील पेरणीचे असून,जवळपास ४ लाख हजार हेक्टरवर शेतकर्यांनी पेरणी केली आहे. घाटाखालील परिस्थिती नाजूक आहे.पाऊस न आल्यास घाटाखाली आणि घाटावरील पिके उलटण्याची शक्यता आहे. अक ोला जिल्हय़ातही ४ लाख ८६ हजार ६00 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत यातील १0 टक्क्यांच्यावर पेरणी आटोपली आहे. यवतमाळ, अमरावती जिल्हय़ातही ५0 टक्क्यांच्या जवळपास पेरण्या आटोपल्या आहेत.
- पाऊस लाबंला आणि तापमानात वाढ झाल्याने पेरणी केलेली वर्हाडातील पिके कोमेजू लागली आहेत. बुलडणा जिल्हयातही हीच परिस्थिती आहे.घाटाखालची परिस्थिती नाजूक आहे. घाटावरही आता पाऊस हवा आहे. एक दोन दिवसात पाऊस न आल्यास दुबार पेरणीची शक्यता नाकारता येत नाही.
- प्रमोद लहाळे,
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,
बुलडाणा.