सलग तिस-या वर्षी दुष्काळाचे सावट
By admin | Published: July 6, 2015 01:41 AM2015-07-06T01:41:53+5:302015-07-06T01:41:53+5:30
४५ टक्के पेरण्या बाकी; ५५ टक्के उलटण्याची शक्यता.
विवेक चांदूरकर / अकोला : जिल्ह्यात गत दोन वर्षांपासून दुष्काळ आहे. दोन वर्षांपूर्वी अतवृष्टी झाल्यामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. जिल्ह्यातील शेती व्यवसायाची दयनीय अवस्था झाली असून, गत दोन वर्षांनंतरही पुन्हा या वर्षी दुष्काळाचे सावट दिसत आहे. गतवर्षी पाऊस तब्बल दोन महिने उशिरा झाला होता. त्यानंतरही नियमित पाऊस झाला नसल्याने शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. जिल्ह्यात दुष्काळ घोषित झाला होता. तसेच आणेवारीही ४१ पैसे होती. त्यानंतर यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस झाला, तरी त्यानंतर पावसाने दडी दिल्याने पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पुन्हा पिकांचे नुकसान होणार असून, दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होणार आहे. गत पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील पिके कोमेजली असून, शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. आगामी तीन ते चार दिवसांत पाऊस झाला नाही तर शेतकर्यांची पेरणी उलटणार असून, दुबार पेरणी करावी लागणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ८३ हजार ८८0 हेक्टरपैकी २ लाख ६५ हजार २९९ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. ही पेरणी सरासरीच्या ५५ टक्के, तर नियोजित लक्ष्याच्या ५८ टक्के आहे. जिल्ह्यात ७ जूनपासून तर १५ जूनपर्यंत जोरदार पाऊस झाला. तसेच पावसाळी वातावरण होते. त्यामुळे शेतकर्यांनी लगबगीने पेरण्या केल्या. मात्र, त्यानंतर पावसाने दांडी दिली असून, पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस बरसला नाही. तसेच तापमानातही वाढ झाली. त्यामुळे पिकांना पावसाची नितांत गरज आहे. सध्या पिके सुकायला सुरुवात झाली आहे. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. १५ जूननंतर पावसाने दांडी दिल्यामुळे जिल्ह्यात २ लाख १८ हजार ५८१ हेक्टरवर पेरणी करण्यात आली नाही. तसेच आगामी काही दिवस पावसाचा अंदाज नाही. त्यामुळे हे क्षेत्र आणखी आठ दिवस रिकामेच राहणार आहे. उशिरा पेरणी केली तर पिकांचे नुकसान होते. आवश्यक प्रमाणात उत्पादन होत नसून, त्यामध्ये घट येते. त्यामुळे शेतकर्यांचे डोळे आकाशाकडे लागले असून, शेतकरी चिंतातूर झाला आहे.
*पीक पद्धतीच बदलणार; २ लाख हेक्टर क्षेत्र रिकामेच
जिल्ह्यात ३ जुलैपर्यंत ४५ टक्के म्हणजे २ लाख १८ हजार हेक्टरवर पेरणी झाली नाही. जिल्ह्यात कडक उन्ह तापत असून, आणखी आठ ते दहा दिवस पावसाचा अंदाज नाही. मूग व उडिदाची पेरणी जून महिन्यातच करणे गरजेचे असते. त्यानंतर पेरणी केली तर उत्पादनात घट येते. त्यामुळे आगामी आठ दिवसांत पाऊस आला तरीही शेतकर्यांना सोयाबीन व तुरीची पेरणी करावी लागणार आहे. परिणामी जिल्ह्यातील पीक पद्धती बदलणार आहे. गतवर्षी मूग व उडिदाची पेरणी अल्प प्रमाणात झाली होती, यावर्षी तीच परिस्थिती ओढवणार आहे.