मुख्य रस्त्यांलगतचा भाग खोदला; पावसामुळे रस्त्यांची दैना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:57 PM2018-07-24T12:57:41+5:302018-07-24T13:00:18+5:30
अकोला : शहरात जलवाहिनीचे जाळे टाकताना मुख्य रस्त्यांप्रमाणेच प्रभागातील अंतर्गत रस्त्यांलगतचा भाग खोदण्यात आला. काही प्रभागांमध्ये रस्तेही खोदण्यात आले आहेत.
- आशिष गावंडे
अकोला : शहरात जलवाहिनीचे जाळे टाकताना मुख्य रस्त्यांप्रमाणेच प्रभागातील अंतर्गत रस्त्यांलगतचा भाग खोदण्यात आला. काही प्रभागांमध्ये रस्तेही खोदण्यात आले आहेत. पावसामुळे खोदलेल्या मातीचा चिखल रस्त्यांवर पसरल्यामुळे पाणीपुरवठ्याची कामे अकोलेकरांच्या जीवावर उठल्याचे दिसून येत आहे. अशा रस्त्यांची दुरुस्ती केल्यानंतरच पुढील जलवाहिनीच्या कामांना मंजुरी देणार असल्याच्या महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या आदेशाला ‘एपी अॅन्ड जीपी’ कंपनीने ठेंगा दाखवल्यामुळे कंपनीला राजकारण्यांचा वरदहस्त लाभत असल्याच्या चर्चेने जोर पकडला आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या ‘अमृत’योजनेच्या माध्यमातून संपूर्ण शहराची जलवाहिनी बदलण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामावर देखरेख ठेवण्यासाठी शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. शहरात पहिल्या टप्प्यातील कामासाठी राज्य शासनाने ११० कोटी मंजूर केले. त्यापैकी ८७ कोटींची निविदा प्रकाशित करण्यात आली होती. जलवाहिनीचे जाळे टाकण्याचा कंत्राट ‘एपी अॅन्ड जीपी’ कंपनीला मिळाला. आज रोजी शहरात ८७ किलोमीटर अंतराचे जलवाहिनीचे जाळे टाकताना कंत्राटदाराने मुख्य रस्त्यालगत व प्रभागात थेट रस्ते खोदून जलवाहिनी टाकली आहे. खोदकाम केलेल्या मुख्य रस्त्यांची चक्क पाच ते सहा महिन्यांपासून दुरुस्ती करण्यात आली नाही. त्याचे परिणाम पावसाळ््यात अकोलेकरांना भोगावे लागत आहेत. खोदलेल्या रस्त्यांलगत चिखल साचला असून, असे रस्ते अकोलेकरांच्या जीवावर उठले आहेत. दुचाकी वाहनधारक, सायकलस्वार, महिला, तरुणी, वयोवृद्ध नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन मार्गाक्रमण क रावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
आयुक्तांच्या आदेशाकडे कानाडोळा का?
रस्त्याचे खोदकाम करून जलवाहिनी टाकल्यानंतर सदर रस्त्याची अवघ्या दहा ते बारा दिवसांत दुरुस्ती करणे तांत्रिकदृष्ट्या अपेक्षित नसले तरी चार-चार महिन्यांपासून मुख्य रस्ते, मुख्य चौकातील दुरुस्तीला का विलंब झाला, असा सवाल उपस्थित करीत मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने सुरु करा, त्यानंतरच पुढील जलवाहिनीच्या कामाला मंजुरी दिली जाईल, असे स्पष्ट निर्देश जलप्रदाय विभागासह कंत्राटदाराला दोन महिन्यांपूर्वी दिले होते. आयुक्तांच्या आदेशाकडे कानाडोळा करीत कंपनीने रस्ता व त्यालगतच्या भागात खोदकामाचा सपाटा कायम ठेवला आहे. हा प्रकार पाहता कंपनीला नेमक्या कोणत्या राजकीय पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे पाठबळ लाभत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.