‘जय संताजी’ नाम घोषाने दुमदुमली मूर्तिजापूर नगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 10:32 PM2017-12-17T22:32:37+5:302017-12-17T22:35:27+5:30
तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त १६ डिसेंबर रोजी शहरातील मुख्य मार्गावरून संताजी महाराज यांच्या पालखीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर: तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त जुनी वस्ती तेलीपुरा येथील समाज भवन परिसरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानयज्ञ सोहळा तथा श्रीमद् भागवत कथेचे आयोजन ९ ते १६ डिसेंबर पर्यंत करण्यात आले. भागवत कथेची सांगता १६ डिसेंबर रोजी शहरातील मुख्य मार्गावरून संताजी महाराज यांच्या पालखीची भव्य शोभायात्रा काढून उत्साहाने करण्यात आली.
संत संताजी महाराज मंदिर येथे सप्ताहानिमित्त श्रीमद् भागवत कथेचे वाचन गोभक्त दिनेश महाराज मोहतुरे भागवताचार्य खुबाळा, ता. सावनेर यांच्या वाणीतून दररोज सकाळी आणि सायंकाळी करण्यात आले. त्याचप्रमाणे हरिपाठ, भारूड, हरिकीर्तन, भजन आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. भागवत कथा श्रवणाचा आनंद समाजबांधवांनी मोठय़ा प्रमाणात घेतला. सप्ताहांतर्गत हभप दिलीप मोरखडे, श्रीकृष्ण महाराज, गोपाळ महाराज बाले, संतोष महाराज ठाकरे, गजानन साबे, विष्णुबुवा रावणकर, माधव काळे, अरविंद पोळकट, भास्कर उमाळे, दिनकर सावळे, अजाबराव वहिले, अतुल महाराज पोळकट यांनीही उपस्थिती दर्शवून हरिकीर्तन, भारूड, हरिपाठाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. १६ डिसेंबर रोजी हभप गुरुवर्य तुकाराम महाराज सखारामपूरकर मठाधीश, इलोरा यांच्या काल्याचे कीर्तन सकाळी झाले. त्यापूर्वी संताजी महाराज मंदिरापासून संताजी महाराज यांच्या पालखीची टाळ-मृदंग, हरिपाठ महिला भजन, बँड, अश्वासह भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ‘जय संताजी माउली’च्या गजराने अख्ख्ये शहर दुमदुमून गेले होते. सं पूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता. काल्याच्या कीर्तनानंतर दुपारी १२ ते ३ पर्यंत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सप्ताहाच्या यशस्वितेसाठी तेली समाज पंचकमिटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक विनायक तुकारामसा गुल्हाने, उपाध्यक्ष श्रीकृष्ण गुल्हाने, सचिव विठ्ठलराव गुल्हाने, इतर सदस्य व समाजबांधवांनी परिश्रम घेतले.