आकोट मार्ग बनला ‘डम्पिंग ग्राऊंड’
By admin | Published: July 31, 2015 01:49 AM2015-07-31T01:49:41+5:302015-07-31T20:27:26+5:30
रस्त्याच्या कडेला घाण व कच-याचे ढीग: दुर्गंधीने नागरिक बेजार.
अकोला: 'स्वच्छ अकोला-सुंदर अकोला' असे बिरुद असलेल्या महानगर पालिका प्रशासनाचे शहराच्या स्वच्छतेकडे पुरते दुर्लक्ष होत असल्याचे चित्र स्थानिक आकोट फैल भागात पहावयास मिळते. येथून आकोटकडे जाणार्या मार्गाच्या कडेला कचर्याचे प्रचंड ढीग व घाण साचली आहे. त्यामुळे या रस्त्याला 'डम्पिंग ग्राऊंड'चे रूप आले आहे. प्रवेशद्वारावरून घर कसे असेल याची कल्पना येत असते. आकोट, दर्यापूर, परतवाडा या भागातील नागरिकांना अकोल्यात येण्यासाठी आकोट फैल भागातून यावे लागते. शहराचा हा दर्शनी भागच अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलेला दिसतो. त्यावरून शहरातील परिस्थिती काय असेल, याचा अंदाज बांधल्या जाऊ शकतो. या मार्गावर घुसर नाका सूक्ष्मतरंग पुनरावर्तन केंद्रापर्यंतचा भाग अत्यंत अस्वच्छ असल्याचे दिसून येते. रेल्वे कर्मचार्यांच्या वसाहतीच्या आवारभिंतीला लागून घाण व कचर्याचे ढीग गत कित्येक दिवसांपासून पडलेले आहेत. नियमितपणे स्वच्छता होत नसल्यामुळे दिवसेंदिवस कचर्याचे ढीग वाढतच आहेत. शहरात प्रवेश करताच घाण व कचर्याचे दर्शन होते. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. पावसाळय़ात तर ही परिस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे. कचरा सडल्यामुळे वातावरणात दुर्गंधी पसरली आहे. या उग्र दर्पाने नागरिक हैराण झाले आहेत. डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. या भागातच मांस विक्रीचे दुकाने आहेत. मांस विक्रेते उरलेल्या मांसाचे तुकडे तेथेच फेकून देतात. त्यामुळे दुर्गंंधीत भरच पडते. महानगर पालिकेने नियमितपणे साफसफाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.