शहरात झोननिहाय होणार डम्पिंग ग्राउंड
By Admin | Published: April 20, 2017 01:35 AM2017-04-20T01:35:07+5:302017-04-20T01:35:07+5:30
अकोलेकरांच्या डोकेदुखीत भर : कचऱ्यावर व्हावी प्रक्रिया!
आशिष गावंडे - अकोला
कचरा साठवणुकीसाठी नायगावस्थित ‘डम्पिंग ग्राउंड’ची जागा अपुरी पडत आहे. शहराचा विस्तार व कचऱ्याची समस्या लक्षात घेता, साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे अपेक्षित असताना महापालिका प्रशासनाने झोननिहाय ‘डम्पिंग ग्राउंड’ निर्माण करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मनपाचा हा प्रयोग भविष्यात अकोलेकरांच्या डोकेदुखीत वाढ करणार असल्याची भीती वर्तविली जात आहे.
नायगाव परिसरात महापालिकेच्या मालकीच्या सुमारे १२ एकर जागेवर ‘डम्पिंग ग्राउंड’ निर्माण करण्यात आले. या ठिकाणी साठवणूक होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्यामुळे कचऱ्याचे ढीग साचले आहेत. परिसरात प्रचंड दुर्गंधीचे साम्राज्य असून, स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. पाण्याचे जलस्रोतदेखील दूषित झाले आहेत. शिवाय, स्थानिक अतिक्रमकांनी मनपाच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा सपाटा लावल्यामुळे समस्येत अधिकच भर पडली आहे. शहरातील कचरा घेऊन जाणाऱ्या मनपाच्या घंटागाडी चालकांना शिवीगाळ करणे, धमकाविण्यासह मारहाण करण्यापर्यंत अतिक्रमकांनी मजल गाठली आहे. एकूणच ही समस्या ध्यानात घेता नायगावातील ‘डम्पिंग ग्राउंड’वरील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची नितांत गरज आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प उभारणे आवश्यक असताना महापालिकेने झोननिहाय ‘डम्पिंग ग्राउंड’ निर्माण करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, त्यानुषंगाने जागेचा शोध घेतला जात आहे. झोननिहाय कचरा साठविल्यास शहराच्या चारही बाजंूनी दुर्गंधीची समस्या निर्माण होऊन जलस्रोत दूषित होतील, यात दुमत नाही. त्यामुळे मनपाचा हा प्रयोग अकोलेकरांसाठी धोक्याची घंटा मानल्या जात आहे. मनपा हद्दीबाहेर हवी असलेली जागा कचऱ्याची समस्या निकाली काढण्यासाठी मनपा आयुक्त अजय लहाने प्रयत्नरत असले, तरी ठोस उपाय निघत नसल्याची परिस्थिती आहे. मध्यंतरी आयुक्त लहाने यांनी मनपा क्षेत्रात सामील झालेल्या विविध शासकीय जमिनींची पाहणी केली होती. त्यामध्ये ‘ई-क्लास’ जागेचा समावेश होता. प्रशासनाने मनपा क्षेत्रात डम्पिंग ग्राउंड निर्माण न करता मनपा क्षेत्राबाहेरील ‘ई-क्लास’ची जागा मिळविण्याची गरज आहे.
कचऱ्याला आग; नागरिक त्रस्त
उन्हाळ्यात नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडला सतत आग लागते. बुधवारी मोठ्या प्रमाणात आग लागली होती. दुर्गंधीयुक्त धुरामुळे नागरिकांना श्वसनाचे विकार जडत असल्याचे स्थानिक रहिवासी सांगतात.
कचऱ्याची साठवणूक सुरू!
मनपाच्या घंटागाडी चालकांकडून झोननिहाय कचरा साठवणूक केली जात आहे. पूर्व झोनमध्ये प्रभागातच कचरा साठविला जात असून, पश्चिम झोन अंतर्गत येणाऱ्या डाबकीच्या पुढे पडीक जागेवर तसेच दक्षिण झोन अंतर्गत रिजनल वर्कशॉप परिसरातील मनपाच्या जागेवर कचरा साठविला जात आहे.