दनोरी येथील तरुणाची निर्घृण हत्या
By admin | Published: November 9, 2014 12:37 AM2014-11-09T00:37:03+5:302014-11-09T00:40:55+5:30
अकोट तालुक्यातील घटना, सात आरोपींना अटक आणि पोलिस कोठडीत रवानगी.
चोहोट्टा बाजार (अकोला) : आकोट तालुक्यातील दनोरी येथील एका तरुणास त्याच गावातील काही जणांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर मिनी ट्रकने चिरडून त्याची हत्या केल्याची घटना ७ नोव्हेंबरच्या सायंकाळी घडली. या प्रकरणी दहीहांडा पोलिसांनी ७ आरोपींना अटक करून, न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
दहीहांडा पोलिस स्टेशनांतर्गत दनोरी येथे ७ नोव्हेंबरच्या सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास जुन्या वादावरून ३८ वर्षीय संदीप शालीग्राम पाखरे याला आरोपींनी सगनमत करून कुर्हाड, काठी, पाइपने मारहाण केली. यामध्ये तो जिवंत राहू नये म्हणून ४0७ मिनी ट्रकखाली चिरडून टाकण्यात आले. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी मृतकाचा भाऊ देवानंद शालीग्राम पाखरे याने दहीहांडा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रेमदास रामराव पाखरे, तिरंदास रामराव पाखरे, अशोक रामराव पाखरे, हिरालाल नाजुकराव पाखरे, नाजुकराव सारंगधर पाखरे, मुरलीधर सारंगधर पाखरे, सिद्धार्थ नागोराव धांडे सर्व रा. दनोरी यांचे विरुद्ध भादंवि कलम ३0२, १४७, १४८, १४९ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप चव्हाण यांचे मार्गदर्शनात दहीहांडा ठाणेदार ताराचंद किल्लेवाले व कर्मचारी पांडुरंग राऊत, संजय घायल, अशोकसिंग ठाकूर, केशव धोटे, मंगेश महाजन, प्रवीण ठाकरे, सुभाष थोरात यांनी आरोपींना रात्रीच अटक केली. आरोपींना ८ नोव्हेंबर रोजी आकोट येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता १३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.