दिवसभरात ३२ रुग्ण वाढले; ८१ जण कोरोनामुक्त झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 06:17 PM2020-08-14T18:17:33+5:302020-08-14T20:14:23+5:30
एकूण ३३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३२०९ वर गेली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे सत्र सुरूच असून, शुक्रवार, १४ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २५, तर रॅपिड चाचण्यांमध्ये आठ असे एकूण ३२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३,२०८ वर गेली आहे. दरम्यान, ८१ जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शुक्रवारी दिवसभरात ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे २३८ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये २५ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २१३ जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्ह असल्याचे निदान झालेल्या २५ जणांमध्ये आठ महिला व १७ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील सहा जणांसह, अकोल्यातील केळकर रुग्णालय व बार्शीटाकळी शहरातील प्रत्येकी तीन जण, पातूर येथील तीन जण, अकोट येथील दोन जण, अकोट तालुक्यातील चंडिकापूर, अकोला तालुक्यातील पाळोदी, मूर्तिजापूर, अकोला शहरातील शिवसेना वसाहत, खदान, कौलखेड, बालाजी नगर व खांबोरा येथील प्रत्येकी एक अशा एकूण २५ रुग्णांचा समावेश आहे.
‘रॅपिड’ चाचण्यांमध्ये ७ पॉझिटिव्ह
दिवसभरात झालेल्या १८१ रॅपिड अॅन्टिजन चाचण्यांमध्ये सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अकोला मनपा क्षेत्रात तीन तर अकोट येथे चार असे सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. अकोला ग्रामीण, बाळापूर, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर येथे चाचण्या झाल्या नाहीत. आतापर्यंत १०,३८२ चाचण्यांमध्ये ५२३ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
८१ जणांना डिस्चार्ज
शुक्रवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३०, कोविड केअर सेंटर येथून २६, उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर येथून १२, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, हॉटेल रेजेन्सी येथून एक, कोविड केअर सेंटर अकोट येथून १० अशा एकूण ८१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
४७८ जणांवर उपचार सुरू
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३,२०८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २,५९९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १३१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४७८ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.