पावसाळ्यातही पारा ३६ च्या वर
By admin | Published: August 11, 2014 10:54 PM2014-08-11T22:54:49+5:302014-08-11T22:54:49+5:30
रपावसाअभावी सारेच चिंतातुर : शेतकर्यांच्या नजरा पुन्हा आकाशाकडे
खामगाव : पावसाळा सुरू झाला, मात्र पाऊस नाही. ढग दाटून येतात परंतु जोराच्या वाहत्या वार्यामुळे वातावरण पुन्हा सामान्य होते. पाऊस पडत नसल्याने तापमानात वाढ होत चालली आहे. यामुळे शेतकरी व सामान्य नागरिकही पाणी नसल्यामुळे चिंतातुर झाले आहेत. चालु आठवड्यात तापमानाचा पारा वाढला असून काल रविवारी कमाल तापमान ३६.0४ अंश से. एवढे होते. खरिप हंगामातील पेरण्या जून महिन्यात होतील या आशेने शेतकर्यांनी पेरणीची तयारी केली होती. मृग नक्षत्रातील पाऊस पडताच शेतकरी पेरणीस लागतात. मात्र यावर्षी वरुण राजाने पाठ फिरविल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या तब्बल दिड महिना उशीरा झाल्या. अर्धा जुलै महिना होईपर्यंंत पाऊस आलाच नाही. २२ व २३ जुलै रोजी झालेल्या पावसामुळे शेतकर्यांनी पेरणीस सुरुवात केली. पेरणीकरिता लागणारी बी-बीयाणे साठी शेतकर्यांनी बॅकाचे तसेच खाजगी कर्ज काढले आहे. मात्र पेरणी झाली व रिमझीम पावसामुळे पिके निघुन आली. दमदार पाऊस येईलच या आशेने शेतकरी पावासाची वाट पाहत आहे. निघुन आलेली कोवळी पिके हवेत डोलत असली तर पुन्हा पावसाने दडी मारल्यामुळे उगवलेली रोपे वाचविण्याचे जणू आव्हानच शेतकर्यांसमोर उभे राहिले. पाऊस नसल्यामुळे केवळ शेतकरीच त्रस्त नाही तर सामान्य नागरिकही चिंतातूर झालेला आहे. दिवसेंदिवस पाणी समस्या बिकट बनत चालली आहे. त्याचा परिणाम आर्थिक बाबीवर होणार असल्याचा अंदाच येत असल्यामुळे अनेकजण चिंताग्रस्त झाले आहेत. तालुक्यातील अनेक भागामध्ये ढग दाटुन येत आहेत. मात्र वेगाने वाहत असलेल्या वार्यामुळे आलेले ढग निघून जात आहेत. वातावरण पुन्हा कोरडेठाक होते. ढग नसल्याने तापमानात वाढ होत चालली आहे. पाऊस आल्यास हवेत आर्द्रता निर्माण होवून उन्हाची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. गेल्या दहा दिवसांत तापमान वाढत चालले आहे. गेल्या तीन दिवसांत तापमान ३४ अंशावरून ३६ अंशापर्यंंंत जाऊन पोहचले आहे. यावरुन तापमान वाढत असल्याचे लक्षात येते.
** कोरड्या दुष्काळाची भीती
पाऊस नसल्यामुळे शेतकर्यांची परिस्थीती गभीर होत चालली आहे. गेल्या सहा दिवसांत तापमानात वाढ होत असल्याने उगवलेली रोपे कोमजण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला नाही तर तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकर्यासह सामान्य नागरिकांनाही पावसाची प्रतिक्षा असुन दुष्काळ पडण्याची अनेकांना भीती वाटत आहे.