धूळ, हवेतील कार्बन कण ठरताहेत श्वसनसंस्थेसाठी कर्दनकाळ
By Atul.jaiswal | Published: November 20, 2019 12:20 PM2019-11-20T12:20:44+5:302019-11-20T12:21:29+5:30
हवेची गुणवत्ता खराब झाली असून, हवेतील घातक कण श्वसनसंस्थेसाठी कर्दनकाळ ठरत आहेत.
अकोला : वाढते औद्योगिकीकरण, वाहनांची वाढलेली प्रचंड संख्या व रस्ते, इमारतींच्या बांधकामांमुळे वातावरणात मिसळणारी धूळ यामुळे हवेची गुणवत्ता खराब झाली असून, हवेतील घातक कण श्वसनसंस्थेसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. जगभरात मानवाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाºया रोगांमध्ये श्वसनविकार तिसºया क्रमांकावर असल्याची माहिती प्रसिद्ध फुप्फुस व श्वसन नलिका तज्ज्ञ व दुर्बिन परीक्षक डॉ. अनिरुद्ध भांबुरकर यांनी मंगळवारी येथे दिली.
जागतिक ‘क्रॉनिक आॅब्सट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज’ (सीओपीडी) दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित एका पत्रकार परिषदेत डॉ. भांबुरकर यांनी श्वसनसंस्थेशी संबंधित विकार, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि औषधोपचार पद्धतीची सखोल माहिती दिली. वातावरणातील धूळ, कार्बन, सल्फेट नायट्रेट, कार्बन मोनोआॅक्साईड व २.५ मायक्रॉन आकाराचे इतर कण हे श्वसनसंस्थेसाठी अत्यंत घातक असल्याचे सांगत डॉ. भांबुरकर म्हणाले की, वायू प्रदूषणामुळे मानवी आरोग्य प्रचंड धोक्यात सापडले आहे. यामध्ये श्वसनविकाराला बळी पडणाºयांची संख्या मोठी आहे. अनेक वर्ष प्रदूषित हवेत काम करणाºया व्यक्ती, धूम्रपान करणाºया व्यक्ती व अनुवांशिकता असणाºया व्यक्तींमध्ये श्वसनसंस्थेशी संबंधित विकार आढळून येतात. श्वसनविकारांमध्ये सीओपीडी, जुनाट खोकला, अस्थमा, अॅलर्जी, कफ पडणे, घसा खरखर करणे, कोरडी ढास लागणे आदी विकारांचा समावेश आहे. श्वसनसंस्थेच्या इतर विकारापेक्षा सीओपीडी हा अत्यंत घातक आजार असून, यामध्ये श्वसननलिका आकुंचन पावतात व त्या कायमस्वरूपी तशाच राहतात. सीओपीडी हा अत्यंत घातक असला, तरी नियमित औषधापचार व संतुलित आहारामुळे त्यावर नियंत्रण मिळविता येते, असेही डॉ. भांबुरकर यांनी सांगितले.
सीओपीडीची लक्षणे
- श्वासनलिका लालसर होणे
- अंतस्थ त्वचेवर कफ चिकटणे
- श्वासनलिका संवेदनशिल होऊन संकुचित होणे
भारतात दरवर्षी आढळतात २ कोटी रुग्ण
श्वसनसंस्थेच्या विकाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, २०१६-१७ मध्ये आलेल्या एका अहवालानुसार भारतात दरवर्षी श्वसनसंस्थेशी संबंधित विकाराचे २ कोटी रुग्ण आढळून येतात. यामध्ये पुरुषांची संख्या ६५ टक्के, तर महिलांची संख्या ३५ टक्के एवढी असल्याचे डॉ. भांबुरकर यांनी सांगितले.
निदानासाठी विविध चाचण्या
श्वसनविकारांचे निदान करण्यासाठी विविध चाचण्या उपलब्ध आहेत. यामध्ये स्पायरोमेटरी, पल्स आॅक्सिमेट्री, ब्राँकोस्कोपी या चाचण्यांचा समावेश आहे.
हे अवश्य करा
- धूम्रपान टाळा
- कचरा जाळणे टाळा
- बाहेर फिरताना मास्क किंवा रुमालचा वापर करा
- नियमित व्यायाम व योगासने