अत्यल्प हमीभावाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:14 AM2021-06-17T04:14:13+5:302021-06-17T04:14:13+5:30

अकोला : बियाणे, खतांच्या किमती वाढत आहे. यामध्ये डिझेल दरवाढीने लागवड खर्चात आणखी भर टाकली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन ...

Dust in the eyes of farmers with very little guarantee! | अत्यल्प हमीभावाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक!

अत्यल्प हमीभावाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक!

Next

अकोला : बियाणे, खतांच्या किमती वाढत आहे. यामध्ये डिझेल दरवाढीने लागवड खर्चात आणखी भर टाकली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढला आहे. यात पिकांना चांगला दरही मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहे. केंद्र शासनाने पिकांच्या आधारभूत किमती जाहीर केल्या. यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद पिकांना अल्पवाढ करण्यात आली आहे. अत्यल्प हमीदर जाहीर करून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सध्या पेट्रोल, डिझेल तसेच सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नांगरणी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सर्वच वस्तूंचे भाव वाढले, मात्र शेतकऱ्यांच्या मालाच्या हमीभावात कसलीच वाढ होत नाही. शेतकऱ्यांची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर शेतकऱ्यांच्या हमीभावात वाढ करणे गरजेचे आहे. हमीभावात वाढ न करता केंद्राने पिकांच्या आधारभूत किमतीत किरकोळ वाढ करून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे.

केंद्राने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीत कापसाला २११ रुपये वाढीव भाव दिला आहे. म्हणजे कापसाला ५७२६ रुपये असा भाव मिळणार आहे, तर कापूस लांब धाग्याला ६०२५ रुपये म्हणजे यात केवळ २०० रुपयांची वाढ केली आहे. केवळ शंभर, दोनशे रुपयांनी आधारभूत किंमत वाढविल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे.

शेतकरी नेते म्हणतात...

सरकारने उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा असे आश्वासन देऊन हे सरकार सत्तेत आले आहे; परंतु राज्य शासनाच्या कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या उत्पादन खर्चाएवढी ही रक्कम नाही. सरासरी उत्पादन खर्च काढण्याची पद्धतच वेगळी आहे. त्यामुळे उत्पादन खर्च अन्यायकारक असेल, सरकारने बाजारपेठांना अधिक मोकळीक द्यावी, कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेले भाव द्यावे.

- डॉ. नीलेश पाटील, युवा आघाडी विदर्भ प्रमुख, शेतकरी संघटना

सोयाबीनचा उत्पादन खर्च २,२३३ हेक्टरी दाखवला. आता ३,३०० रुपयांची एक बॅग आहे. एका बाजूला बियाणे, खतांचे भाव वाढत असताना उत्पादन खर्च कमी दाखवून शेतमालाच्या किमती काढल्या. हा दुटप्पीपणा असून, ही हमी किंमत नसून मुळातच कमी किंमत आहे.

- मनोज तायडे, संयोजक, शेतकरी जागर मंच

सरकारने नेहमीच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा सरकारने दिला, असे सांगून जखमेवर मीठ चोळत आहे. शेतकऱ्यांप्रती हे सरकार संवेदनशील नाही व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणही नाही.

- प्रशांत गावंडे, संयोजक, शेतकरी जागर मंच

शेतकरी म्हणतात...

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविल्याचे सांगण्यात आले आहे. १००, २०० रुपयांनी दरवाढ करून ही कसही दुप्पट वाढ आहे. शासन याकरिता कोणते निकष लावते हे शेतकऱ्यांना कळत नाही. त्यामुळे यात स्पष्टता हवी.

- डॉ. विजय म्हैसने, शेतकरी, कापसी

सरकारने घोषित केल्याप्रमाणे भाव दिले नाही. हरभऱ्यात दोन-तीन वर्षांत ४०० रुपये दरवाढ झाली आहे. माल असल्यास दर मिळत नाही. लागवड खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे हमीदर अत्यल्प आहे.

- संतोष टाले, शेतकरी, माझोड

शासनाने पिकांच्या आधारभूत किमतीत कुठे ३००, तर कुठे ६५ रुपये वाढविले आहे. सद्य:स्थितीत बियाण्यांचे दर वाढले आहे. यामध्ये सोयाबीन बियाण्यांचे दर ३६०० पर्यंत वाढले असून, त्यानुसार हमीदरात वाढ झाली नाही.

- गणेश काळे, शेतकरी, तामशी

Web Title: Dust in the eyes of farmers with very little guarantee!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.