‘लोकमत ऑनलाईन’चा दणका : दारूच्या दुकानांवरील प्राध्यापकांची ड्युटी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 05:31 PM2020-05-07T17:31:54+5:302020-05-07T17:51:00+5:30
प्राध्यापकांची ड्युटी चक्क दारूच्या दुकानावर लावण्यात आल्याचा प्रकार बुधवारी ‘लोकमत’ने ऑनलाइन आवृत्तीमधून समोर आणला.
- राजेश शेगोकार
अकोला : संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर व्यसनमुक्तीचा ध्यास घेऊन प्रचार आणि प्रसाराचे काम केले; मात्र त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्याच कर्मभूमीत स्थापन झालेल्या अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील संत गाडगेबाबा महाविद्यालयाच्या नऊ प्राध्यापकांची ड्युटी चक्क दारूच्या दुकानावर लावण्यात आल्याचा प्रकार बुधवारी ‘लोकमत’ने ऑनलाइन आवृत्तीमधून समोर आणला. मूर्तिजापूर तालुक्यातील नऊ दारू दुकानांवर या प्राध्यापकांची समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, दारू दुकानांवर ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ व इतर अटी, शर्तींचे पालन होत आहे की नाही, हे पाहण्याचे काम सोपविण्यात आले होते. या संदर्भातील ‘लोकमत ऑनलाइन’चे वृत्त बुधवारी दिवसभर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला उपरती आली व संध्याकाळी सुधारित आदेश काढून दारू दुकानांवर प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात येऊ नये असे निर्देश देण्यात आले आहेत.
गत दोन दिवसांपासून महाराष्ट्र शासनाने राज्यभरात देशी व विदेशी दारू विक्रीचे नियम ठरवून दिले आहेत. तब्बल महिनाभरानंतर दारूची दुकाने उघडल्यामुळे दारुड्यांची प्रचंड गर्दी या दुकानांवर उसळली आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेचा बोजवारा उडण्याची भीती निर्माण झाली आहे. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी तसेच दारू विक्रीच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची खातरजमा करण्यासाठी मूर्तिजापूर तालुक्यातील दारू दुकानांवर चक्क प्राध्यापकांना जबाबदारी सोपवण्यात आली. हे सर्व प्राध्यापक संत गाडगेबाबा महाविद्यालयाचे आहेत. विशेष म्हणजे अनेक महाविद्यालयीन युवक तसेच माजी विद्यार्थीही या दारू विक्रीच्या रांगेत प्राध्यापकांना आढळून आले; मात्र ड्युटी म्हणून याच प्राध्यापकांना विद्यार्थ्यांकडे कानाडोळा करावा लागला. संत गाडगेबाबांच्या कर्मभूमीतच हा प्रकार घडावा, यापेक्षा दुर्दैव कोणते, असे अनेक व्यसनमुक्ती प्रचारकांनी लोकमतशी बोलताना सांगितले होते. या संदर्भात ‘लोकमत’ने मूर्तिजापूरचे तहसीलदार प्रदीप पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सदर शिक्षकांना जाणीवपूर्वक दारूच्या दुकानावर ड्युटी देण्यात आलेली नाही. आमच्याकडे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळानुसार आम्ही शिक्षकांना रेशन दुकानावर, इतर कर्मचाºयांना चेक पोस्टवर, तर काही कर्मचाºयांना इतर जबाबदारी दिली आहे. उर्वरित जे मनुष्यबळ उपलब्ध होते ते दारूच्या दुकानावर लावण्यात आले आहे. त्यामध्ये प्राध्यापक आले आहेत; मात्र हे जाणीवपूर्वक घडलेले नाही व या आदेशचा आढाव घेण्यात येईल, अशी ग्वाही दिली. संध्याकाळी जिल्हाधिकारी यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत तहसीलदारांना दारूच्या दुकानांवर शिक्षकांच्या ड्युटी लावू नये, असे निर्देश दिले. केवळ पोलिस प्रशासनालाच याची जबाबदारी देण्यात यावी असे स्पष्ट केले आहे.