‘द्वारका उत्सव’ होतोय नामशेष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2016 12:59 AM2016-09-02T00:59:32+5:302016-09-02T02:31:36+5:30
वाशिम येथील उत्सव राज्यात प्रसिद्ध; बैलांची जागा घेतली ट्रॅक्टरने.
वाशिम, दि. १: राज्यात प्रसिद्ध असलेला वाशिम येथील द्वारका उत्सव दिवसेंदिवस नामशेष होत चालला आहे. या उत्सवातील लोकांचा कमी होत असलेला सहभाग व बैलांच्या रोडवलेल्या संख्येवरून या उत्सवाला उतरती कळा लागल्याचे दिसून येते. वाशिम येथील द्वारका उत्सव अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असल्याचे वाशिम जिल्ह्याचा इतिहास या पुस्तकात नमूद आहे. पर्यावरणाप्रती जागृती करण्यासोबतच प्राणिमात्रांवर प्रेम करण्याच्या संदेश देणारा हा उत्सव १९५४ पूर्वी सुरू झाल्याचे ज्येष्ठ नागरिक दिनकर वाटाणे यांनी सांगितले.
१९५४ मध्ये येथील चंदू माळी व नामदेव मामा यांनी या उत्सवाला राज्यस्तरीय रूप दिले होते. त्यानंतर सातत्याने हा उत्सव याच पद्धतीने साजरा केल्या जाऊ लागला; मात्र गत ८ ते १0 वर्षांपासून या उत्सवास उतरती कळा लागली. त्याचे कारणही तसेच आहे. पोळय़ाच्या दुसर्या दिवशी बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून या उत्सवात मोठय़ा प्रमाणात आधी बैलांचा समावेश राहायचा. सध्या बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने बैलांची संख्याही फार कमी झाली आहे. यामुळे या उत्सवातील बैलांची संख्याही कमी होत आहे. तथापि, दरवर्षी शहरात द्वारका उत्सव साजरा होतो; मात्र यामध्ये दिवसेंदिवस बैलांची संख्या रोडावली आहे. येथील देवपेठ व चामुंडा देवी द्वारका उत्सव मंडळाच्या सदस्यांसह इतरही मंडळांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. याही वर्षी द्वारका उत्सवाचे २ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.
वाशिम येथील द्वारका
येथे पोळय़ाच्या दुसर्या दिवशी द्वारका निघतात. कामट्या व चमकिले ताव, कागद यापासून उंच अशी सचित्र द्वारका उभारतात. यामध्ये दिंडी, भजनी मंडळ, लेजीम इत्यादी सहभागी होतात. शेतकरी आपल्या बैलांना सजवून सहभागी करतात. सजविलेल्या बैलांना व दिंडीला बक्षिसेही असतात. शहरातील ठरवून दिलेल्या मार्गावरून बालाजी मंदिरासमोर गेल्यावर महाप्रसाद होतो. यामध्ये तरुण-तरुणींचा पूर्वी समावेश राहायचा.
-स्वातंत्र्यानंतर सुरू झालेला द्वारका उत्सव नेमका कधी सुरू झाला, हे जरी सांगता येत नसले तरी १९५४ च्या दरम्यान हा उत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध होता. हा उत्सव पाहण्यासाठी राज्यातून नागरिक यायचे. यंत्रयुगामुळे जनावरांची संख्या दिवसेंदिवस कमी झाल्याने याचा परिणाम या उत्सवावरही झाला. तरीही तरुण मंडळी तो टिक वून आहे.
- दिनकर वाटाणे
सधन शेतकरी, वाशिम