उमरा येथील द्वारका उत्सव रद्द; ३०० वर्षांची परंपरा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:23 AM2021-09-06T04:23:50+5:302021-09-06T04:23:50+5:30
वर्षभर शेतामध्ये राबणाऱ्या वृक्षभराजाच्या ऋणातून मुक्त होण्याचा दिवस म्हणजे द्वारका उत्सव. या दिवशी शेतकरी बैलांना सजवून ग्रामदैवत वाकाजी महाराजांच्या ...
वर्षभर शेतामध्ये राबणाऱ्या वृक्षभराजाच्या ऋणातून मुक्त होण्याचा दिवस म्हणजे द्वारका उत्सव. या दिवशी शेतकरी बैलांना सजवून ग्रामदैवत वाकाजी महाराजांच्या मंदिरात समाधी दर्शनासाठी नेतात. सुरुवातीला वाकाजी महाराज संस्थानच्या बैलाची पूजा करण्यात येते. त्यानंतर त्या बैलाच्या पाठीवर शंकर-पार्वतीच्या प्रतिमाने सजविलेला मखर ठेवण्यात येतो. बैल भजनाच्या गजरात गावामधून फिरतो. त्यानंतर मानाचा बैल शेतकऱ्यांच्या घरापासून ढोलताशांच्या गजरात वाकाजी महाराज समाधीदर्शन करतो. मखरामध्ये शेतकरी त्या मानाच्या बैलाला उभे करतात व ढोलताशांच्या व भजनाच्या गजरात गावामधून त्या मखराची मिरवणूक काढल्या जाते. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येते; मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर द्वारका उत्सव रद्द करण्यात आला आहे.
-------------
गर्दी न करण्याचे आवाहन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर द्वारका उत्सव रद्द झाल्याने संस्थान परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन संस्थानचे अध्यक्ष रमेश भगत यांनी केले आहे. द्वारका उत्सवाची प्रथा पुरातन काळापासून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
------------------------
बैलाची मखरातून मिरवणूक काढण्याची प्रथा दीर्घ काळापासून आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी हा उत्सव खंडित झाला आहे.
-अमोल बोचे, लाडेगाव शेतकरी.