अकोला जिल्ह्यात ५६ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी
By Atul.jaiswal | Published: September 13, 2022 06:38 PM2022-09-13T18:38:39+5:302022-09-13T18:39:25+5:30
पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींनी १६ ऑगस्टअखेर ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अकोला : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींनी १६ ऑगस्टअखेर ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कालावधीत २,१२,६५२ शेतकरी लाभार्थीपैकी फक्त १,५६,२८१ शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. या लाभार्थींना १२व्या हप्त्याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. मात्र अद्यापही ७७,२७७ लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे १६ सप्टेंबरनंतर या योजनेचा लाभ विसरा, अशी सध्याची स्थिती आहे. दरम्यान, प्रशासनाकडून ई-केवासयी करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेमध्ये जिल्ह्यात २,१२,६५२ लाभार्थींनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. यापैकी अद्याप ७७,२७७ लाभार्थींची ई-केवायसी बाकी असल्याने आगामी हप्ता जमा करण्यासाठी त्यांना अडचण येण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता शेतकऱ्यांनी जवळच्या सेवा केंद्रावर किंवा सेतू केंद्रावर शुक्रवार दि. 16 सप्टेंबरपर्यंत आधार कार्ड नोंदणी करुन ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.