हनिमूनला जाण्यासाठी हवी ई पास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:14 AM2021-06-10T04:14:15+5:302021-06-10T04:14:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : अत्यावश्यक कामाच्या निमित्ताने संबंधितांना शहराबाहेर जाता यावे म्हणून सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीत ई - पासची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अत्यावश्यक कामाच्या निमित्ताने संबंधितांना शहराबाहेर जाता यावे म्हणून सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीत ई - पासची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, काही महाभागांनी या सुविधेसाठी अफलातून कारणे सांगत ई पासची मागणी केली. काहींना हनिमूनसाठी ई पासची आवश्यकता होती. काहींना थंड ठिकाणी जायचे होते, तर काहींना गावात राहून कंटाळलो म्हणून बाहेरगावी जाऊन फिरून यायचे म्हणूनही पास हवा होता. अनेकांची कारणे अफलातून होती. त्यामुळे ६५ ते ७० टक्के ई पास ॲप्लिकेशन रिजेक्ट करण्यात आले आहेत.
कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्याला आळा घालण्यासाठी सरकारने लॉकडाऊन घोषित केले. त्यामुळे गावाबाहेर जाण्याची सोय नव्हती. मात्र ज्यांना अत्यावश्यक काम आहे, त्यांना ई पास मिळवून कोणत्याही ठिकाणी जाता येत होते. ई पास मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केले. मे महिन्यात २५ ते ३० टक्के अर्जदारांनी अंत्यसंस्काराला किंवा रुग्णालयात असलेल्या नातेवाइकांच्या भेटीला जाण्याचे कारण दाखवले, तर काही महाभागांनी हनिमून, सहज फिरायला जायचे आहे, म्हणून ई पासची मागणी केली.
---
३८ दिवसांत ८७६४ अर्ज
अकोल्यात २३ एप्रिल ते ३१ मे दरम्यान ८७६४ जणांनी ई पास मिळण्यासाठी अर्ज केला. अर्जामध्ये पुरावा म्हणून जोडलेली कागदपत्रे आणि कारण संयुक्तिक असल्यामुळे ३०८२ जणांना पास मंजूर करण्यात आला, तर ५६८२ जणांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आले.
---
महाराष्ट्राबाहेर जाण्यासाठी १२३८ पास मंजूर
मंजूर झालेल्या अर्जामध्ये महाराष्ट्राबाहेर जाण्याची परवानगी मागणाऱ्यांची संख्या मोठी होती. संयुक्तिक कारणांमुळे १२३८ जणांना ई पास देण्यात आले.
---
कारणे तीच ती!
बहुतांश अर्जदार ई पास मिळवण्यासाठी एकसारखी कारणे सांगत होते.
आजारी असलेल्या व्यक्तीला भेटायला जाण्यासाठी किंवा अंत्यसंस्काराला जाण्यासाठी ई पासची मागणी करीत असल्याचे संबंधित अधिकारी सांगतात. मात्र अनेक महाभाग गावात कंटाळलो म्हणून बाहेरगावी जायचे आहे असे सांगत आणि काहीजण नुसतेच बाहेरगावच्या नातेवाइकाला भेटायला जायचे आहे, म्हणून ई पास मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.
--
म्हणून नाकारला पास
पोलिसांच्या साइटवर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर २४ तासांत ई पास उपलब्ध करून दिला जातो. अर्ज केल्यानंतर संबंधितांना एक टोकन मिळते. अकोल्यात पोलीस अधीक्षक कार्यालय असून त्या त्या भागात राहणाऱ्या नागरिकांना पोलीस ठाण्याच्या माध्यमातून किंवा थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातही पाससाठी ऑनलाईन अर्ज करता येते.
अर्जासोबत ज्या गावाला जायचे आहे, ज्यांच्याकडे जायचे आहे, त्यांच्याकडून मागितलेले तेथील डॉक्टरांचे प्रमाणपत्र, अर्जदाराचे फोटो, पत्ता तसेच आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यात ही माहिती जोडल्यानंतर संबंधित व्यक्तीला टोकन दिले जाते. पोलीस अधीक्षक कार्यालयात त्या अर्जाची छाननी केली जाते. यावेळी अनेकजण संयुक्तिक कारण सांगत नसल्याने किंवा आवश्यक कागदपत्रे जोडत नसल्याने ई पास नाकारला जातो.
---