तांत्रिक बिघाडात ‘ई-पाॅस मशीन’ बंद; जिल्ह्यात धान्याचे वितरण ठप्प
By संतोष येलकर | Published: July 27, 2024 02:19 PM2024-07-27T14:19:43+5:302024-07-27T14:20:58+5:30
‘ई-पाॅस मशीन’वर अंगठा लावल्यानंतर संबंधित रेशनकार्डधारक लाभार्थीस धान्याचा लाभ मिळतो
अकोला: तांत्रिक बिघाडामुळे रास्त भाव धान्य दुकानांमधील ‘ई-पाॅस मशीन ’ गेल्या पाच दिवसांपासून बंद असल्याने, जिल्ह्यात धान्याचे वितरण ठप्प झाले आहे. त्यामुळे रास्त भाव दुकानांमधून धान्य मिळणार तरी कधी, याबाबतची प्रतीक्षा जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांकडून केली जात आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत रास्त भाव दुकानांमध्ये ‘ई-पाॅस मशीन’व्दारे दरमहा पात्र रेशनकार्डधारकांना धान्याचे वितरण करण्यात येते.
‘ई-पाॅस मशीन’वर अंगठा लावल्यानंतर संबंधित रेशनकार्डधारक लाभार्थीस धान्याचा लाभ मिळतो; परंतु तांत्रिक बिघाडामुळे गेल्या २२ जुलैपासून रास्त भाव धान्य दुकानांमधील ‘ई-पाॅस मशीन ’ बंद पडत आहेत. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातील १ हजार ६१ रास्त भाव धान्य दुकानांमधील पात्र रेशनकार्डधारकांना धान्य वितरणाची प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्यानुषंगाने ‘ई-पाॅस मशीन’ सुरळीत कधी होणार आणि रास्त भाव दुकानांमधून धान्याचा लाभ कधी मिळणार, याबाबतची प्रतीक्षा धान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील पात्र रेशनकार्डधारकांकडून केली जात आहे.
३,१२,४८१ रेशनकार्डधारक
जिल्ह्यात ३ लाख १२ हजार ४८१ रेशनकार्डधारक असून, त्यामध्ये अंत्योदय अन्न योजनांतर्गत ४५ हजार ४६३ रेशनकार्डधारक आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील २ लाख ६७ हजार १८ रेशनकार्डधारकांचा समावेश आहे.
अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थी रेशनकार्डधारकांना दरमहा रास्त भाव दुकानांमधून मोफत धान्याचे वितरण करण्यात येते; मात्र ‘ई-पाॅस मशीन ’ वारंवार बंद पडत असल्याने, जिल्ह्यातील रेशनकार्डधारक लाभार्थ्यांना मोफत धान्याच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.
रेशनकार्डधारक लाभार्थींची अशी आहे संख्या
तालुका लाभार्थी
अकोला ग्रामीण २१६९४७
अकोला शहर १७५६६०
अकोट १६५६६७
बाळापूर १६३८६९
बार्शीटाकळी १३४८०३
मूर्तिजापूर १३३३६८
पातूर १२०१८०
तेल्हारा १२५५७८
रास्त भाव धान्य दुकानांतील ‘ई-पाॅस मशीन ’ गेल्या पाच दिवसांपासून बंद असल्याने, धान्याचे वितरण वाटप रखडले आहे. त्यामुळे रेशनकार्डधारकांची गैरसोय होत असून, धान्य मिळत नसल्याने रास्त भाव दुकानदार आणि रेशनकार्डधारकांमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत.
योगेश अग्रवाल, महानगराध्यक्ष, रास्त भाव धान्य दुकानदार संघटना, अकोला.