ई-पास नावालाच; कोणीही यावे, टिकली मारून जावे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:16 AM2021-04-26T04:16:48+5:302021-04-26T04:16:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : ग्रामीण भागासह शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ग्रामीण भागासह शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असल्यास तसेच एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी ई-पास सक्तीचे करण्यात आले आहेत. मात्र शहरात ई-पास नावालाच असून, कुणीही यावे, टिकली मारून जावे अशी परिस्थिती आहे.
राज्यात ई-पासशिवाय कुठल्याही शहरात आता प्रवेश दिला जात नाही. असे असतानाही रविवारी शहराच्या चारही मार्गावर पाहणी केली असता शहरात ई-पास नावालाच असल्याचे दिसून आले आहे. शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे; मात्र तिथे कुणालाही अडवले जात नसल्याचे दिसून येत होते. सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या दरम्यान, शहराच्या टोकांवर कुठलाही बंदोबस्त किंवा पोलीस दिसून आला नव्हता. वाहनांची तपासणीही सुरू नसल्याचे दिसून आले. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने ई-पास अनिवार्य केली असून, या आदेशाचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते; मात्र दुसरीकडे शहरात दाखल होणाऱ्यांना ई-पास तपासणी केल्याशिवाय प्रवेश मिळत असल्याचे रविवारी दिसून आले.
------------------------------------
बाळापूर-अकोला मार्ग (बाळापूर नाका)
कोरोनाची स्थिती शहरापेक्षा ग्रामीण भागात अतिशय वाईट आहे. ग्रामीण भागातील संदिग्ध रुग्ण शहरात मोठ्या प्रमाणात दाखल होतात. बाळापूर-अकोला मार्गावरील बाळापूर नाका येथे कोणीही पोलीस कर्मचारी रविवारी दिसून आला नाही.
----------------------------------------
पातूर-अकोला रोड (हिंगणा बायपास)
पातूर-अकोला मार्गाने शहरात प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रविवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास हिंगणा बु. तसेच पुढे रस्त्यावर पाहणी केली असता कोणीही पोलीस कर्मचारी दिसून आला नाही. वाहनांची मात्र ये-जा सुरूच असल्याचे दिसून आले.
---------------------------------
बार्शीटाकळी-अकोला रोड (खडकी, शिवापूर)
ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शहरात प्रवेश करण्यासाठी ई-पास आवश्यक असताना बार्शीटाकळी-अकोला मार्गावर कुणीही पोलीस कर्मचारी दिसून आला नाही. त्यामुळे नियमांकडे पाठ दाखविल्याचे दिसून येत आहे.
-----------------------------------------
ई-पासच्या नियमांबाबत अनेक जण अनिभिज्ञ
अत्यावश्यक सेवेसाठी बाहेरील जिल्ह्यात तसेच ग्रामीण भागातून शहरात प्रवेश करण्यासाठी ई-पास गरजेचे आहे. रविवारी काही प्रवाशांना विचारणा केली असता अनेकांना ई-पासविषयी माहितीच नसल्याचे सांगितले. शहराला जोडणाऱ्या मार्गावर पोलीस दिसून न आल्याने वाहनांची बिनधास्त ये-जा सुरू होती.