ई-पॉस मशीन बंद; जिल्ह्यात धान्य वितरण ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 02:49 PM2020-01-08T14:49:05+5:302020-01-08T14:49:10+5:30
रास्त भावातील धान्याच्या लाभासाठी शिधापत्रिकधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांमधील ई-पॉस मशिन वारंवार बंद पडत असल्याने शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करण्यात खोळंबा निर्माण होत आहे. गेल्या चार दिवसांपासून रास्त भाव दुकानांमधील ई-पॉस मशिन बंद असल्याने जिल्ह्यात धान्य वितरण ठप्प झाले आहे. त्यामुळे रास्त भावातील धान्याच्या लाभासाठी शिधापत्रिकधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत दरमहा पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरीत करण््यात येते. रास्तभाव दुकानामार्फत वितरित करण्यात येत असलेल्या आॅनलाईन धान्य वितरण प्रक्रियेत जिल्ह्यातील रास्तभाव दुकानांमध्ये ई-पॉस मशिन लावण्यात आल्या आहेत. यात मशिनद्वारे शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण करण्यात येत आहे. परंतु रास्तभाव दुकानांमधील ई-पॉस मशीन वारंवार बंद पडत असल्याने शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करण्यात अडथळा निर्माण होत आहे. त्यामध्ये गत शनिवारपासून जिल्ह्यातील रास्तभाव दुकानांमधील ई-पॉस मशीन बंद पडल्या असून, धान्य वितरण बंद पडले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना रास्त भावातील धान्याच्या लाभासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ई-पॉस मशिनला इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने सारे मुसळ केरात गेले आहे. त्यामुळे अनेक शिधापत्रिकाधारकांना रेशनपासून वंचित राहावे लागत आहे.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील बहुतांश दुकानांमध्ये ही समस्या निर्माण झाली आहे. अनेक शिधापत्रिकाधारकांच्या बोटाचे ठसे ई-पॉस मशिनवर उमटत नसल्यामुळे त्यांना धान्याच्या लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे. ई-पॉस मशिनवर ग्राहकांचे ठसे घेण्याकरिता दुकानदारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
शासनाकडून आॅनलाईन धान्य वितरणाची राबविण्यात येत असलेली योजना शिधापत्रिकाधारकांच्या फायद्याची असली तरी ई-पॉस मशिनवर उमटत नसलेले बोटाचे ठसे आणि वारंवार ई-पॉस मशिन बंद पडत असल्याने शिधापत्रिकाधारकांना धान्याच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यासंदर्भात जिल्हा पुरवठा विभागाने उपाययोजना करुन जिल्ह्यात रास्तभाव दुकानांमधील वारंवार बंद पडणाऱ्या ई-पॉस मशिन तातडीने दुरुस्त करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. दरम्यान, रास्तभाव दुकानांमधील ई-पॉस मशिन वारंवार बंद पडत असल्याने मशीन तातडीने दुरुस्त करण्यात याव्या, अन्यथा ई-पॉस मशिन जिल्हा पुरवठा विभागाकडे परत करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा रास्तभाव दुकानदार संघटनेच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे यापूर्वीच देण्यात आला आहे.
गेल्या शनिवारपासून जिल्ह्यात रास्तभाव दुकानांमधील ई-पॉस मशिन बंद आहेत त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण ठप्प आहे. त्यानुषंगाने ई-पॉस मशिन तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे.
- शत्रुघ्न मुंडे
जिल्हाध्यक्ष, रास्तभाव दुकानदार संघटना