ई-सेवा केंद्र संचालकाला ‘एसीबी’कडून अटक!
By admin | Published: March 10, 2016 01:59 AM2016-03-10T01:59:33+5:302016-03-10T01:59:33+5:30
वाशिम येथे अमरावती विभागातील पहिली कारवाई.
वाशिम : तक्रारदारास त्याचे जातीचे प्रमाणपत्र, मुलाचे जातीचे प्रमाणपत्र, मुलीचे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र व तिचे रहिवासी प्रमाणपत्र देण्यासाठी शासकीय दराशिवाय ५00 रुपयांची लाच घेणारा महा ई-सेवा केंद्राचा संचालक दीपक रामगोपाल अग्रवाल याला एसीबीच्या पथकाने ९ मार्च रोजी दुपारच्या सुमारास रंगेहात पकडले. महा-ई सेवा केंद्राच्या संचालकाला अटक करण्याची अमरावती विभागातील ही पहिलीच कारवाई होय. मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे दीपक अग्रवाल याच्याकडे शासनाचे महा ई-सेवा केंद्र आहे. तक्रारदाराला त्याचे जातीचे प्रमाणपत्र, मुलाचे जातीचे प्रमाणपत्र, मुलीचे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र व तिचे रहिवासी प्रमाणपत्र काढून देण्याकरीता संचालक अग्रवालने १२५0 रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती एक हजार रुपयांमध्ये प्रमाणपत्र देण्याचे ठरले व त्याचवेळी तक्रारदाराने ५00 रुपये अग्रवालला दिले. उर्वरित ५00 रुपये फेब्रुवारीमध्ये देण्याचे ठरले होते. दरम्यान, तक्रारदाराने वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. एसीबीचे पोलीस निरीक्षक एन.बी. बोर्हाडे यांनी ९ मार्च रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास किन्हीराजा येथील महा-ई सेवा केंद्राच्या परिसरात सापळा रचला. यावेळी दिनेश अग्रवाल याने तक्रारदाराकडून उर्वरीत ५00 रुपयांची लाच घेताच एसीबीच्या पथकाने अग्रवाल याला रंगेहात पकडले. लाचखोर अग्रवाल याच्याविरुद्ध कलम ७, १३ (१) (ड) सहकलम १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. सदर कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक महेश चिमटे, अपर पोलीस अधीक्षक विलास देशमुख, पोलीस उपअधीक्षक आर.व्ही. गांगुर्डे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बोर्हाडे यांचे पथकाचा समावेश होता. महा ई-सेवा केंद्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून लाभार्थींकडून लाच घेण्याचे प्रकार सुरू आहेत; परंतु महा ई-सेवा केंद्रामध्ये लाच स्वीकारल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई होऊ शकते, याची माहिती सर्वसाधारण जनतेला माहिती नसल्यामुळे एसीबीकडे कुणीच तक्रार देत नसल्याचा अनुभव आहे. अमरावती विभागामध्ये महा ई-सेवा केंद्राच्या संचालकाविरुद्ध कारवाई करण्याची वाशिम जिल्ह्यात सुरुवात झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक यांनी दिली.