मातीची दरड कोसळली, ढिगाऱ्याखाली दबून मजुराचा जागीच मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:23 AM2021-04-30T04:23:48+5:302021-04-30T04:23:48+5:30
निंबा फाटा/बोरगाव वैराळे : सोनाळा व बोरगाव वैराळे शेतशिवारात माती खोदकाम करताना उंच दरड अंगावर कोसळल्यामुळे बाळापूर येथील ...
निंबा फाटा/बोरगाव वैराळे : सोनाळा व बोरगाव वैराळे शेतशिवारात माती खोदकाम करताना उंच दरड अंगावर कोसळल्यामुळे बाळापूर येथील जाकीर अहमद (३५) या मजुराचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला तर तीन मजूर जखमी झाले. ही घटना गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बाळापूर महसूल विभागात रेती व मातीच्या अवैध उत्खननाला ऊत आला आहे. बाळापूर येथील कंत्राटदार महसूल विभागाकडून मातीची राॅयल्टी घेऊन अवैध उत्खनन करतात. वीटभट्टीकरिता लागणाऱ्या माती परवानगीचे व उत्खननाचे मोठे गौडबंगाल आहे. मातीच्या ट्रकांची महसूल विभागाकडून तपासणीच होत नसल्यामुळे राॅयल्टी १०० ब्रासची व माती उत्खनन ५०० ब्रासच्या वर करण्यात येत आहे. माती उत्खननाची परवानगी देताना अटी, शर्तींचे संबंधित कंत्राटदाराकडून पालन होत नाही. माती उत्खननाची परवानगी महसूल विभागाकडून आर्थिक देवाण-घेवाणीतून मिळत असल्यामुळे स्थळ निरीक्षण केले जात नाही व याचा गैरफायदा घेत, जेसीबी मशीनद्वारे अवैध उत्खनन करण्यात येत आहे. या स्थळावरून दररोज १०० ट्रक मातीची उचल करण्यात येते. मातीच्या उंच कड्याखाली माती भरताना अचानक दरड कोसळल्यामुळे चार मजूर ढिगाऱ्याखाली दबले होते. यात जाकीर अहमद (रा. बाळापूर) या मजुराचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने मृत्यू झाला. अन्य तीन मजुरांचे प्राण वाचविण्यात यश आले. जाकीरचा मृतदेह बाळापूर येथील रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. या मजुराच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या कंत्राटदाराविरूद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. बाळापूर पोलिसांनी याप्रकरणी नोंद केली असून, पुढील तपासासाठी हे प्रकरण उरळ पोलिसांकडे वर्ग केले आहे.
फोटो : मेल फोटोत - जाकीर अहमद
जाकीरचा संसार उघड्यावर
जाकीर अहमद याच्या अंगावर मातीची दरड कोसळल्यामुळे त्याचा जागीच मुत्यू झाला. जाकीर हाच घरातील कर्ता पुरूष होता. त्याच्या एकट्याच्या कमाईवर कुटुंबातील सहा लोकांचा उदरनिर्वाह चालत होता. परंतु, घरातील कर्त्या पुरूषाचा मृत्यू झाल्याने, त्याच्या परिवारावर मोठे संकट उभे ठाकले आहे. त्याच्या कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून, संबंधित कंत्राटदाराने त्याच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
मातीच्या अवैध उत्खननाला प्रोत्साहन, तहसीलदारांवर आरोप
सोनाळा पूर्णा येथील आठ ते दहा शेतकऱ्यांनी यावर्षी वीटभट्ट्यांना लागणारी गाळाची माती बाळापूर येथील वीटभट्टी मालकांना विकली. तहसीलदारांनी दिलेल्या परवानगीपेक्षा मातीचे अधिक प्रमाणात उत्खनन करण्यात येत आहे. संपूर्ण उत्खननाची पाहणी तहसीलदारांनी केली होती. परंतु, तहसीलदारांनी कोणतीही कारवाई केली नाही. अर्थपूर्ण संबंध असणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यात येत नाही. जे अर्थपूर्ण संबंध जोपासत नाहीत, त्यांच्याविरूद्ध जाणीवपूर्वक कारवाई करून त्यांचे ट्रॅक्टर, जेसीबी जप्त करून पोलीस ठाण्यात नेण्यात येतात, असा आरोप येथील काही वीट उद्योजकांनी केला आहे.