अकोला जिल्ह्यात ईस्टर संडे हर्षोल्हासात साजरा
By Atul.jaiswal | Published: March 31, 2024 07:10 PM2024-03-31T19:10:48+5:302024-03-31T19:11:34+5:30
गेल्या चाळीस दिवसांपासून ख्रिश्चन धर्मीयांचा पवित्र लेन्थ महिना सुरू होता.
अकोला : शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये रविवार, ३१ मार्च रोजी ईस्टर संडे अर्थात प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा दिवस हजारो ख्रिश्चन समाज बांधवांनी मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. शहरातील प्रोटेस्टंट आणि रोमन कॅथलिक प्रार्थनास्थळांमध्ये यावेळी विशेष प्रार्थनासभांचे तसेच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मागील रविवारी प्रभू येशू ख्रिस्तांच्या यरुशलेम प्रवेशानिमित्त जगभरात पाल्म संडे साजरा करण्यात आला. त्यानंतर अखिल मानवजातीच्या पापक्षालनासाठी प्रभू येशूंनी क्रूसखांबावर दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून जगभरात २९ मार्च रोजी गुड फ्रायडे अर्थात उत्तम शुक्रवार हा सण साजरा करण्यात आला आणि रविवार, ३१ मार्च रोजी येशूंच्या पुनरुत्थानानिमित्त ईस्टर संडे हर्षोल्हासात साजरा झाला. खदान ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्चमध्ये रेव्हरंड नीलेश अघमकर यांनी ईस्टरनिमित्त बायबलमधील वचनांच्या आधारे आठवड्यातील पहिला दिवस या विषयावर संदेश दिला.
यावेळी संडे स्कूल, महिला संघ, तरुण संघातील सदस्यांनी प्रभू येशूंच्या पुनरुत्थानाबाबत गीते सादर केली. विविध चर्चमधील नवतरुणांना यावेळी बाप्तिस्मा देण्यात आला. तसेच लहान बालकांची अर्पणेही करण्यात आली. गेल्या चाळीस दिवसांपासून ख्रिश्चन धर्मीयांचा पवित्र लेन्थ महिना सुरू होता. या चाळीस दिवसांच्या काळात ख्रिश्चन बंधू-भगिनी उपवास आणि प्रार्थना करतात. गुड फ्रायडेच्या दिवशी या उपवासांची सांगता होते. शहरातील सर्वच चर्चेसमध्ये ईस्टर संडे मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.
विदर्भात केवळ अकोल्यातच होते प्रात:कालची प्रार्थना!
दरम्यान, रविवारी प्रभू येशू खिस्तांच्या पुनरुत्थानानिमित्त बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्चच्या प्रांगणात रविवारी पहाटे सहा वाजता अकोल्यातील चर्चचे सदस्य तेथे उपस्थित होऊन प्रात:कालच्या प्रार्थनासभेत सहभागी झाले होते. अशाप्रकारची प्रात:कालची प्रार्थना संपूर्ण विदर्भात केवळ अकोल्यातच होते, हे उल्लेखनीय! त्यानंतर सकाळी नऊ वाजता इंग्रजांच्या काळापासून अस्तित्वात असलेल्या अकोल्यातील एकमेव ख्रिश्चन कॉलनीमधून ज्येष्ठ सदस्य जस्टीन मेश्रामकर, पंच मंडळातील राजेश ठाकूर, अजय वर्मा, अमित ठाकूर, चंद्रकांत ढिलपे, सरला मेश्रामकर, अरविंद बिरपॉल यांच्या नेतृत्वात दिंडी काढण्यात आली. यावेळी ‘प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे,’ अशा घोषणाही देण्यात आल्या. यावेळी ईस्टर संडेनिमित्त नाचून आणि गाऊन विविध गीते सादर करण्यात आली आणि येशूच्या पुनरुत्थानाचा आनंद व्यक्त करण्यात आला.