पथदिव्यांच्या दुरुस्तीला कंत्राटदाराचा खाे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:33 AM2020-12-13T04:33:39+5:302020-12-13T04:33:39+5:30
शहरात एलइडी पथदिवे लावल्यास वीज देयकांत घसरण येणार असल्याचा दावा मनपा प्रशासनाकडून केला जात आहे. प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण केल्यानंतर ...
शहरात एलइडी पथदिवे लावल्यास वीज देयकांत घसरण येणार असल्याचा दावा मनपा प्रशासनाकडून केला जात आहे. प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण केल्यानंतर दुभाजकांमध्ये एलइडी पथदिवे लावण्यात आले असून, काही रस्त्यांवर अद्यापही पथदिवे लावण्यात आले नाहीत. महापालिकेने २० काेटी रुपयांतून पाेल उभारणे व त्यावर एलइडी पथदिवे लावण्यासाठी पुणे येथील मे. राॅयल इलेक्ट्रिकल कंपनीची नियुक्ती करण्यात आली. तसेच केंद्र शासन प्रमाणीत इइएसएल कंपनीला महापालिकेच्या खांबांवर एलइडी पथदिवे लावण्यासाठी नियुक्त करण्यात आले. इइएसएलमार्फत सुमारे २८ काेटी रुपयांतून पथदिवे लावण्याचे काम सुरू आहे. सदर दाेन्ही कंपन्यांकडे पथदिव्यांची देखभाल दुरुस्तीही साेपविण्यात आली आहे. परंतु मागील काही महिन्यांपासून दाेन्ही कंपन्यांकडून नादुरुस्त पथदिव्यांची दुरुस्ती केली जात नसल्याचे समाेर आले आहे.
मनपाकडून दंडात्मक कारवाई नाहीच !
पथदिव्यांच्या करारनाम्यात दाेन्ही कंपन्यांनी २४ तासांच्या आत पथदिव्यांची दुरुस्ती न केल्यास दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली आहे. शहराच्या विविध भागातील बंद पथदिव्यांची आठ आठ दिवस दुरुस्ती केली जात नाही. असे असतानाही मनपाकडून संबंधित कंपन्यांवर कारवाई हाेत नसल्याने काही नगरसेवकांसह कर्मचाऱ्यांचे खिसे गरम हाेत असल्याचे बाेलल्या जाते.
या रस्त्यांवर उजेड कधी?
शहरात कायम वर्दळ असलेल्या टिळकराेड, नेकलेसराेड, खाेलेश्वर मार्ग तसेच मलकापूर मार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतरही या रस्त्यांवर एलइडी पथदिवे उभारण्यात आले नाहीत. या मार्गावर पाेल व केबल लावण्यासाठी मनपा प्रशासनाकडे निधी उपलब्ध नसल्याची माहिती आहे.
संपर्क क्रमांक दिला; तक्रारींचे निरसन हाेइल का?
प्रभागातील नादुरुस्त पथदिवा तातडीने दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाने ०७२४ २४२५६११ संपर्क क्रमांक जारी केला आहे. या क्रमांकावर अकाेलेकरांना सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत तक्रार नाेंदवता येईल. परंतु पूर्वानुभव पाहता नागरिकांच्या तक्रारींचे निरसन हाेइल का? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.