रानभाज्या खा अन् निरोगी राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:23 AM2021-08-12T04:23:24+5:302021-08-12T04:23:24+5:30

पावसाळ्यात मनुष्याची पचनक्षमता कमकुवत झालेली असते. त्यामुळे या काळात निसर्गाचे देण असलेल्या रानभाज्यांचा समावेश आहारात करणे गरजेचे आहे. माळरानांवर ...

Eat legumes and stay healthy | रानभाज्या खा अन् निरोगी राहा

रानभाज्या खा अन् निरोगी राहा

Next

पावसाळ्यात मनुष्याची पचनक्षमता कमकुवत झालेली असते. त्यामुळे या काळात निसर्गाचे देण असलेल्या रानभाज्यांचा समावेश आहारात करणे गरजेचे आहे. माळरानांवर कर्टुले, चिवळ, आघाडा, पाथरी, आंबाडी, केणा, करवंद, चमकोऱ्याची पाने, फांदीची भाजी, तरोटा, आंबट चुका, वाघाटे, गवती चहा, गोबरू कंद, तांदुळजा, सुरण कंद, कुर्डू, गुळवेल, शेवगा अशा विविध रानभाज्या विपुल प्रमाणात उपलब्ध असतात. सर्वच प्रकारच्या आरोग्यवर्धन आणि प्रतिकारशक्ती वाढविणारा हा रानमेवा वर्षातून एकदा तरी सेवन केलाच पाहिजे, असे अहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

या रानभाज्या आपल्याला ठाऊक आहेत का?

तरोटा

तरोट्याची भाजी उष्ण असते. त्यामुळे वात आणि कफदोष कमी होतो. तुरट चवीची ही भाजी मेथीच्या भाजीप्रमाणे बनवता येते. या भाजीने पोट साफ होते, शिवाय त्वचारोग होण्याचा धोका कमी असतो.

कर्टुले

थोडीशी कडवट चवीची ही भाजी यकृतासाठी उपयोगी आहे. पोट साफ होते आणि मूळव्याधासारखा त्रासही कमी करते. थोडी काटेरी कारल्यासारखी दिसते.

कुर्डू

पावसाळ्यात मिळणारी ही भाजी गावाकडच्या भागात आवडीने खाल्ली जाते. ही भाजी मूत्रमार्गाच्या समस्या कमी करते. जुनाट खोकला, कफ कमी करू शकते. ही भाजी आपल्या पालेभाज्यांप्रमाणेच बनवतात.

तांदुळजा

चवळी माठ असतो, तशीच ही माठाची भाजी दिसते. थोडी चिकट असणारी ही भाजी, श्रावण महिन्यातील सणात नैवेद्य दाखवण्यासाठी केली जाते. काही लोक याच भाजीला माठलाही म्हणतात.

सुरण कंद

ही भाजी म्हणजे जमिनीत वाढणाऱ्या खोडाचा प्रकार आहे. मूळव्याधीवर अतिशय गुणकारी असून, अग्नीमांद्य, दमा, खोकला, जंत, यकृताचे आजारावर ही भाजी लाभदायक आहे.

या रानभाज्या झाल्या दुर्मीळ

वाघाटी

वाघाटीचा वेल काटेरी असून, ते झाडावर चढतात. अलीकडच्या काळात ही वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ही वनस्पती उष्ण, उत्तेजक व पित्तनाशक असते. कफ प्रवृत्तीच्या व्यक्तींसाठी ही भाजी अतिशय गुणकारी मानली जाते.

हरसण

ही भाजी डोंगराळ भागात उगवते. पूर्वी प्रुचर मात्रेत आढळून येणारी ही भाजी आता दुर्मीळ झाली आहे. मेथीसारखी पाणे असलेली ही भाजी चविष्ट असून, अंगदुखीवर गुणकारी मानली जाते. काही औषधींमध्येही या भाजीचा वापर होतो.

रानभाज्या शक्तिवर्धक

विविध प्रकारच्या रानभाज्यांमध्ये आरोग्यासाठी आवश्यक असलेली सर्वच प्रकारची जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. या भाज्यामुळे पावसाळ्यात कमकुवत झालेली पचनक्षमता सुधारण्यास मदत होते. शिवाय शरीराची रोगप्रतिकारक क्षमताही वाढते. रानभाज्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी लाभदायकच आहे.

- अंजली वाघ, आहारतज्ज्ञ, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला

Web Title: Eat legumes and stay healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.