महापालिकेचा काॅन्टॅक्ट ट्रेसिंगला खाे; वैद्यकीय विभाग सैरभैर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:18 AM2021-04-25T04:18:42+5:302021-04-25T04:18:42+5:30
संसर्गजन्य कोरोना विषाणूचा जिल्ह्यासह शहराच्या कानाकोपऱ्यात झपाट्याने प्रादुर्भाव झाल्याचे चित्र आहे. एप्रिल २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण मनपा क्षेत्रात ...
संसर्गजन्य कोरोना विषाणूचा जिल्ह्यासह शहराच्या कानाकोपऱ्यात झपाट्याने प्रादुर्भाव झाल्याचे चित्र आहे. एप्रिल २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण मनपा क्षेत्रात आढळून आला होता. जानेवारीच्या अखेरपासून पुन्हा एकदा महापालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचा परिणाम वैद्यकीय आरोग्य यंत्रणेवर पडला आहे. अशास्थितीत मनपा प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययाेजना राबविणे अपेक्षित असताना तसे हाेत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतरही संबंधित रुग्णाच्या घरी तातडीने फवारणी करणे व कुटुंबीयांची तसेच शेजाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने पोहोचणे अपेक्षित असताना विलंब केला जात आहे.
फवारणी का नाही ?
सुरुवातीला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्या घरी जाऊन सर्वेक्षण करणे, कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करणे तसेच संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची जबाबदारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली होती. मागील काही दिवसांपासून ही जबाबदारी वैद्यकीय आरोग्य यंत्रणेकडे सोपविण्यात आली आहे. मनपाच्या परिचारिकांनी किंवा आशा सेविकांनी कोरोनाबाधित रुग्णाच्या घरी जाऊन तातडीने पुढचे सोपस्कार पार पाडणे अपेक्षित असून, रुग्णाच्या घरी फवारणी केली जात नसल्याची माहिती आहे.
गृह विलगीकरणासाठी अर्ज नाहीच!
काेराेनाबाधित रुग्णाला उपचारानंतर गृह विलगीकरणासाठी झाेन कार्यालयाकडून परवानगी दिली जाते. परंतु, रुग्णांना छापील अर्ज न देता त्याची छायांकित प्रत आणण्यास सांगितल्या जाते. कडक निर्बंधांमुळे झेराॅक्स सेंटर बंद असल्याने रुग्णांची फरफट हाेत आहे. यामुळे काेराेनाच्या प्रसाराला हातभार लागत असून अद्यापही प्रशासनाने छापील अर्ज उपलब्ध करून दिले नाहीत, हे येथे विशेष.