खासगी संस्थांच्या आठव्या वर्गावर गंडांतर

By admin | Published: April 21, 2017 01:52 AM2017-04-21T01:52:06+5:302017-04-21T01:52:06+5:30

जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवी, आठवीचे ६१० वर्ग वाढणार!

The eclipse on the eighth grade of private organizations | खासगी संस्थांच्या आठव्या वर्गावर गंडांतर

खासगी संस्थांच्या आठव्या वर्गावर गंडांतर

Next


अकोला : जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमध्ये यावर्षीपासून पाचवी आणि आठवीचा वर्ग सुरू होणार आहे. शिक्षण समितीच्या ठरावानंतर इयत्ता पाचवी आणि आठवीचे मिळून एकूण ६१० वर्ग येत्या सत्रापासून सुरू करण्याची फाइल अंतिम मंजुरीच्या टप्प्यात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात खासगी संस्थाच्या इयत्ता आठवीचा वर्ग असलेल्या शाळांवर गंडांतर येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
शासनाने २ जुलै २०१३ रोजीच इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळांना पाचवी आणि इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीचा वर्ग सुरू करण्याचा आदेश दिला आहे. त्यातच बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याचे शासनावर बंधनकारक आहे. त्यातही शिक्षण प्रणालीत इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवी अशी संरचना अस्तित्वात आली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अस्तित्वात असलेल्या संरचनेत बदल करणेही आवश्यक झाले.
त्यासाठी शासनाने निर्देश दिल्यानंतरही अंतराचा गोंधळ निर्माण करून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पाचवी आणि आठवी सुरू करण्यास विलंब करण्यात आला. त्यातून खासगी शाळांना जीवदान देण्याचे प्रकार घडले. त्यानंतर प्रधान सचिवांच्या समितीने याबाबत उद्भवणाऱ्या सर्व समस्यांचे निराकरण करत तातडीने वर्ग निर्मिती करण्याचा आदेश दिला. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने ६ मार्च २०१७ रोजी झालेल्या बैठकीत ठराव घेत ६१० नवे वर्ग निर्माण करण्याला मंजुरी दिली आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने नवे वर्ग निर्मितीला मंजुरीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांच्याकडे फाइल सादर केली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांच्याकडे ती अभिप्रायासाठी पाठवण्यात आली. त्यावर उद्या शुक्रवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.

आठवीसाठी शोधावे लागणार विद्यार्थी
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या काही शाळांचा दर्जा आजही चांगला आहे. त्यातच सेमि इंग्लिश असल्याने त्या शाळांतून सातवी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी बाहेर पडतात की नाही, ही चिंता आता त्या गावात खासगी संस्थांची इयत्ता आठवी असलेल्या संस्थाचालकांना सतावणार आहे. आठवीत प्रवेश न झाल्यास तो वर्गच बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनाही बदलेल्या शैक्षणिक रचनेनुसार वर्गांची निर्मिती करावी लागणार आहे.

अतिरिक्त शिक्षकांची समस्या सुटणार
जिल्हा परिषदेमध्ये सद्यस्थितीत शंभरपेक्षाही अधिक संख्येने शिक्षक अतिरिक्त असल्याची माहिती आहे. चालू सत्रात नव्याने निर्माण होणाऱ्या ६१० वर्गावर या शिक्षकांना पदस्थापना देत समायोजन करण्याचा पर्याय निर्माण झाला आहे.

सर्वच शाळांमध्ये वाढणार वर्ग
जिल्हा परिषदेच्या काही मोजक्या शाळांमध्ये गेल्या वर्षी इयत्ता आठवीचे वर्ग सुरू झाले. त्याठिकाणी खासगी संस्थांच्या शाळा नसल्याने कोणत्याही अडचणीशिवाय ते सुरू झाले. मात्र, इतर ठिकाणी खासगी संस्थाचालकांच्या दबावामुळे टोलवाटोलवीच झाली. आता खासगी संस्थाचालकांची झोप उडवणारा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.

इयत्ता पाचवीचे ३५६, तर आठवीचे २५४ नवे वर्ग
जिल्हा परिषदेच्या इयत्ता चौथीपर्यंत असलेल्या शाळांमध्ये पाचवा वर्ग जोडण्यासाठी ३५६ वर्गांची भर पडणार आहे. तर इयत्ता सातवीपर्यंत असलेल्या शाळांमध्ये आठवा वर्ग जोडण्यासाठी २५४ वर्गांची भर पडणार आहे. एकूण ६१० नव्या वर्गांची निर्मिती होणार आहे.

चालू वर्षात जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमध्ये नवीन संरचनेनुसार इयत्ता पाचवी आणि आठवीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. फाइल अंतिम मंजुरीच्या टप्प्यात आहे.
- प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक जिल्हा परिषद.

Web Title: The eclipse on the eighth grade of private organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.