रद्दीपासून साकारले इकोफ्रेंडली अष्टविनायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:23 AM2021-09-07T04:23:27+5:302021-09-07T04:23:27+5:30
संजय उमक मूर्तिजापूर : येथील प्रतीक नगरमध्ये राहणाऱ्या कुणाल मांजरे याने लॉकडाऊनचा सदुपयोग करून अभ्यासाबरोबर कला जोपासत त्याने कागद ...
संजय उमक
मूर्तिजापूर : येथील प्रतीक नगरमध्ये राहणाऱ्या कुणाल मांजरे याने लॉकडाऊनचा सदुपयोग करून अभ्यासाबरोबर कला जोपासत त्याने कागद व रद्दीपासून सुंदर अष्टविनायक साकारले आहेत.
कुणाल हा डीएडचा विद्यार्थी असून, तो अमरावती येथे शिवाजी महाविद्यालयात शिक्षण पूर्ण करतो आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक महिन्यांपासून महाविद्यालय बंद असल्याने ऑनलाईन अभ्यास सुरू आहे. सतत घरी व मोबाईलवर राहून कंटाळलेला कुणालमधला कलावंत जागा झाला. त्याने गुगलवरून अष्टविनायकाचे फोटो गोळा करीत, त्या फोटोवरून घरी असलेल्या रद्दी व वर्तमानपत्र पाण्यात भिजत ठेवून तयार झालेल्या लगद्यापासून उत्कृष्ट अशा आठ गणेशाच्या दीड ते दोन फूट आकाराच्या इकोफ्रेंडली मूर्ती साकारल्या आहेत.
--------------
पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न करणार !
कुणालने निसर्गाचे व पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न म्हणून केवळ कागदाच्या लगद्यापासून विविध कलाकृती बनविणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. कागदाशिवाय इतर कुठल्याही वस्तूचा वापर न करता सुरुवातीला कुणालने तुळजाभवानीचा मुखवटा तयार करून त्याला तुळजाभवानीचे मूर्त स्वरूप दिले. तेव्हापासून विशेष काही करण्याची आवड कुणालमध्ये निर्माण झाली.
----------------
मला कोणाचेही मार्गदर्शन मिळाले नाही. जे सुचत गेले, ते मी करत गेलो. शाळा व अभ्यास करून मी कला जोपासतो. भविष्यात पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने ही कला अधिक चांगल्याप्रकारे जोपासणार आहे.
-कुणाल केशव मांजरे, मूर्तिजापूर.