शिवजन्मोत्सव सोहळ्याला प्रबोधनासह एकात्मतेची किनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 02:03 PM2020-02-12T14:03:33+5:302020-02-12T14:03:39+5:30
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने १२ ते १९ फेब्रुवारीदरम्यान शिवसप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
अकोला : सार्वजनिक शिवजयंतीनिमित्ताने सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने १२ ते १९ फेब्रुवारीदरम्यान शिवसप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी शिवसप्ताहात वैचारिक जागर, इतिहासाला उजाळा देत वक्तृत्व, निबंध, चित्रकला, रांगोळी, वेशभूषा, किल्ले बांधणी स्पर्धा, व्याख्यानमाला, आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहेच, सोबतच मुस्लीम समाजाचा सक्रिय सहभाग असून, एकात्मतेचा संदेश देण्याचा संकल्प केला असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डॉ.अभय पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
शिवजन्मोत्सवाला वक्तृत्व स्पर्धेपासून प्रारंभ होणार असून, १३ फेब्रुवारीला विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा, १३ ते १८ फेब्रुवारीदरम्यान व्याख्यानमालेंतर्गत विविध शाळा महाविद्यालयात महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. १६ फेब्रुवारीला मोटारसायकल रॅली व वेशभूषा स्पर्धेचे आयोेजन, तसेच रंगभरण स्पर्धा, आरोग्य शिबिराचे आयोेजन करण्यात आले आहे. १८ फेब्रुवारीला सकाळी रांगोळी स्पर्धा तर सायंकाळी महाराणा प्रताप बाग ते शिवाजी पार्क दरम्यान मशाल रॅली काढण्यात येणार आहे. १९ फेब्रुवारीला शिवजन्मोत्सवाचा मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे सकाळी किल्ले बांधणी स्पर्धा, दुपारी शिवजयंती सजावट स्पर्धा, शिवाजी पार्क येथून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे होणार आहे. याठिकाणी विनोदअण्णा भोसले परभणी यांचे जाहीर व्याख्यान, शिवरायांवरील निवडक शॉर्ट फिल्मचे प्रदर्शन होणार असल्याची माहिती समितीने दिली. पत्रकार परिषदेला समितीचे अध्यक्ष डॉ. अभय पाटील, कार्याध्यक्ष पवन महल्ले, सचिव चंद्रकांत झटाले, शोभायात्रा प्रमुख पंकज जायले, डॉ. संदीप चव्हाण, प्रा. विजय कौसल, प्रा. इसाक राही, संगीता कोरपे आदींसह समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
शिवकालीन शास्त्रास्त्र प्रदर्शन, शिवगौरव पुरस्काराचे वितरण
या शिवसप्ताहामध्ये १७, १८, १९ फेब्रुवारीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे शस्त्र संग्राहक व इतिहास अभ्यासक पंकज दुसाने, अमळनेर यांच्या संग्रहातील शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्ये करणाºया मान्यवरांना शिवगौरव पुरस्काराने मुख्य सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे.
उर्दू शाळांसह मदरशांमध्येही शिवचरित्राचा जागर
शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा जागर उर्दू शाळांसह मदरशांमध्येही करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. समितीमधील शिवचरित्राचे अभ्यासक विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शिवचरित्र सांगणार आहेत.