खाद्य तेल एक रुपयाने महागले; डॉलर्सच्या तुलनेत रुपया घसरल्याचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 02:42 PM2018-09-05T14:42:37+5:302018-09-05T14:44:02+5:30
अकोला : आंतरराष्ट्रीय डॉलर्सच्या तुलनेत भारतीय रुपया घसरल्याने देशभरातील खाद्य तेल एका रुपयाने महागले आहे.
- संजय खांडेकर
अकोला : आंतरराष्ट्रीय डॉलर्सच्या तुलनेत भारतीय रुपया घसरल्याने देशभरातील खाद्य तेल एका रुपयाने महागले आहे. खाद्य तेलाचे दर एका रुपयाने वाढल्याने पर्यायाने सर्वसामान्य माणसांच्या घरातील भाजी महाग झाली आहे.
भारतातील १३० कोटी लोकांना दरवर्षी २०० लाख टनाच्या वर खाद्य तेल लागते. यापैकी ८० टक्के तेलाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून आयात होते, तर २० टक्के तेलाचे उत्पादन भारतात होते. पामतेल, रिफाईन, सोयाबीन, राइस तेल आणि सूर्यफूल तेल दरवर्षी विदेशातून येते. यूएसए, मलेशिया, इंडोनेशिया, ब्राझील, अर्जेंटिना, रशिया या देशातून भारताला सातत्याने खाद्य तेल विकत घ्यावे लागते. आंतरराष्ट्रीय डॉलर्सच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने भारताला खाद्य तेल विकत घेताना जास्त रक्कम मोजावी लागत आहे. मंगळवारी ही घसरण कायम राहिली. डॉलर्सची किंमत भारतीय मुद्रेत ७१.५० पैसे झाली. त्यामुळे देशभरात पामतेल, रिफाईन, सोयाबीन, राइस तेल आणि सूर्यफूल तेल खाद्य तेलाचे दर एक रुपयाने वधारले आहेत. ही किंमत अधिक वाढण्याची शक्यता असल्याने सामान्य माणसाला त्याचा जबर फटका बसणार आहे.
*आयात शुल्कातून वाढला देशाचा महसूल!
कच्च्या तेलावर पूर्वी आयात शुल्क नव्हते; पण अलीक डे कच्च्या तेलावार जीएसटीसह ३८.५ टक्के आयात शुल्क लागले आहे. सोबतच रिफाईन तेलावर पूर्वी अडीच टक्के आयात शुल्क होते. ते आता ५५ टक्के वाढविण्यात आल्याने आयात शुल्कातून अंदाजे ४५ हजार कोटींची वाढ देशाच्या महसुलात होणार आहे.
- वास्तविक पाहता खाद्य तेलाचे भाव अनेक वर्षांपासून स्थिर आहे. त्यात फार बदल नाही; मात्र भाजप सरकारने खाद्य तेलाच्या आयात शुल्कात विक्रमी वाढ करून महसूल वाढविला आहे. त्यातूनच शासन शेतकऱ्यांना हमीभावाची मदत करीत आहे.
-वसंत बाछुका,
उद्योजक, अकोला.